Bollywood Actress Kirti Kulhari Cyber Fraud: बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती कीर्ती कुल्हारी ( Kirti Kulhari) हिची सायबर फसवणूक ( Cyber Fraud) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात सायबर भामट्यांनी तिचा मोबाईल फोन आणि क्रेडिट कार्डची अनधिकृतपणे माहिती मिळवत अवघ्या काही मिनिटांत 2 लाख 43 हजार 852 रुपये लंपास करण्यात आले आहेत. याप्रकरणी कीर्तीने मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
थिएटरमध्ये असताना मिळाला व्यवहाराचा अलर्ट
मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती कुल्हारी वर्सोवा येथे राहते. ती अंधेरी पश्चिम येथील फन रिपब्लिक मॉलमधील सिनेपोलिस थिएटरमध्ये असताना तिच्या बँकेकडून Aeromexico Airlines वरून 2,525 अमेरिकन डॉलर इतक्या व्यवहाराचा अलर्ट आला. हा व्यवहार संशयास्पद वाटल्यानं तिने तातडीने बँकेच्या टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधला.बँकेने तपास केल्यानंतर तिच्या क्रेडिट कार्डवरून एकूण चार मोठे व्यवहार झाल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बँकेने संबंधित क्रेडिट कार्ड तात्काळ ब्लॉक केले.
'पासवर्ड कुणालाही दिला नव्हता'
पोलीस तक्रारीत अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने स्पष्ट केले की, तिच्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड पूर्णपणे गोपनीय होता आणि तो तिने कोणालाही सांगितला नव्हता. प्राथमिक तपासात तिचा मोबाईल किंवा कार्ड मालवेअर किंवा स्पायवेअरच्या माध्यमातून हॅक झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबोली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच सायबर सेल बँकेच्या व्यवहारांचे संदर्भ क्रमांक आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे.
कीर्ती कुल्हारीच्या कामाविषयी..
दरम्यान, या घटनेपूर्वी कीर्ती कुल्हारीने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली होती. निर्माती म्हणून तिच्या पहिल्या फीचर चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर दिली होती. मिशन मंगल, हिसाब बराबर, पिंक, तसेच ओटीटीवरील फोर मोर शॉर्ट प्लीज या वेब सिरीजमधून कीर्ती घराघरात पोहोचली.
