Kiran Mane post : अभिनेत्री जान्हवी कपूर सातत्याने सामाजिक विषयांवर भाष्य करताना पाहायला मिळाली आहे. एका व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं 'जातीप्रथेचे निर्मुलन' हे पुस्तक वाचल्याविषयी भाष्य केलंय. शिवाय तिने डॉ. आंबेडकर यांच्याबाबत देखील भाष्य केलंय. जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेते किरण माने यांनी तिचं कौतुक केलंय. शिवाय किरण माने यांनी मराठी सिनेसृष्टीतील काही लोकांबाबत देखील लिहिलं आहे. किरण माने यांनी पोस्टमध्ये काय काय लिहिलंय? जाणून घेऊयात...

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी 

आरक्षणावरनं गळे काढणारी मोठी जमात मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे. नथुरामी पोंक्श्या तर मुलीला नोकरी मिळाल्यावरसुद्धा तो आनंद निखळपणे घेऊ शकला नव्हता. मुलीचं अभिनंदन करतानाही आरक्षणावरुन टोमणा मारण्याचा दळभद्रीपणा केला होता त्यानं. नुकतीच 'अर्ध्या बिगबॉस'नं पिवळ्या-बावळ्या झालेल्या एका अपरिपक्व पोरीनं आरक्षणावरून गरळ ओकली आहे.

मराठी कलाकारांमध्ये अशी मोठी पिलावळ आहे जिचा 'समाजाशी' आणि 'इतिहासाशी' कनेक्टच नाही. पाच हजार वर्षांपासूनच्या इतिहासावर नजर टाकली की 'माणसा'कडं बघण्याची नजर बदलुन जाते. माणूस माणसात येतो... आणि या 'माणूस'पणाशिवाय सकस कलाकृती निर्माण करता येत नाही. मराठी नाटक, सिनेमा साऊथपासून आणि जगापासूनच का मागे आहे? प्रेक्षकांपासून दूर का आहे? याची कारणं इथं दडलेली आहेत... असो.

जान्हवी कपूर ही श्रीदेवी-बोनी कपूरची मुलगी आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली. पण तिची बुद्धीमत्ता, जाण आणि समज आज किती मराठी अभिनेत्रींमध्ये आहे??? माझी खात्री आहे आज मराठीत टॉपला आहेत (असा आभास निर्माण केल्या गेलेल्या) अशा एकाही अभिनेत्रीनं किंवा अभिनेत्यानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे वाचलेले नाहीत. छत्रपती शिवरायांच्या लढाया सोडून त्यांचं रयतेसाठीचं कार्य, स्वराज्याची संकल्पना आणि स्वराज्य बुडवणारे 'खरे शत्रू' याबद्दल त्यांना कणभरही माहिती नसणार, याबाबतीत शंकाच नाही.बाबासाहेबांची 'जातीव्यवस्थेचे निर्मुलन' आणि 'शुद्र पुर्वी कोण होते?' ही दोन पुस्तकं वाचलेला माणूस आरक्षणालाच नव्हे, तर कुठल्याही माणसाला कमी लेखणार नाही. जान्हवीच्या समाजभानाला सलाम.जय शिवराय... जय भीम !  - किरण माने.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : ओठांवर लाली, डोळ्यांवर गॉगल; अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स