Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून विशेष चर्चेत आहेत. पण त्याआधी किरण माने एका मोठ्या गोष्टीमुळे बरेच चर्चेत राहिलेत. स्टार प्रवाह मालिकेतील मुलगी झाली हो या मालिकेत किरण माने विलास पाटील ही भूमिका साकारत होते. पण अचानक त्यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. त्यावेळी महिलांशी गैरवर्तन यांसारखे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले. पण त्यावरही योग्य न्यायनिवाडा करत आपली बाजू स्पष्ट केली. याविषयी त्यांनी नुकतच कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 


ती फेसबुक पोस्ट अन् त्यानंतरची ट्रोलिंगची लाट


तुम्हाला एका मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं तेव्हाची अशी कोणती गोष्ट आहे का?जी अजून तुम्ही सांगितली नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटलं की,'त्यावेळची खूप गुपितं आहेत. मी काही आता सगळीच सांगणार नाही, पण काही सांगतो आता. 5 जानेवारीला मी एक पोस्ट केली होती. जी सॅरकास्टिक होती. एक प्रेक्षक जरी असला तरी आम्ही कलाकार नाटकाचा प्रयोग करतो, अशी ती पोस्ट होती.  त्यावेळी पंतप्रधान मोदी पंजाबात एका सभेसाठी गेले होते. या सगळ्याचा संबंध लोकांनी माझ्या पोस्टशी लावला आणि मला प्रचंड ट्रोल केलं. त्यानंतर दोन-चार दिवसांत काही चक्र फिरायला लागली. धमक्यांचे फोन येऊ लागले, आम्ही याला सिरियलमधून काढायची सेटिंग लावली आहे, अशीही पोस्ट अनेकांनी केली होती.  त्याचे आजही स्क्रिनशॉट्स आहेत. '


अन् मला मालिकेतून काढून टाकण्यात आलं - किरण माने


पुढे त्यांनी म्हटलं की, 'त्यानंतर हे सगळं स्टार प्रवाह चॅनलच्या पेजवर गेलं आणि तिथे त्यांनी बायकोट किरण माने असा ट्रेंड चालवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान लिहिलं आहे. त्यात त्यांनी प्रत्येकाला अधिकार दिला आहे, सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा. त्यामुळे मी काही वेगळं करत नव्हतो. त्या ठिकाणी काँग्रेसचं कोणी असतं तर मी याहून टिका केली असती. 12 जानेवारीपर्यंत शुटींग करत होतो. त्यानंतर 13 जानेवारीला शुटींग झाल्यावर फोन आला की तुम्ही या सिरियलमध्ये नाही आहात. उद्यापासून आम्ही तुम्हाला रिप्लेस करतोय. तेव्हा मी त्यांना कारण विचारलं. त्यांनी सांगितलं की तुमच्याविषयी खूप तक्रारी येत आहेत आणि फोन कट केला. त्यानंतर मी चॅनल हेडना फोन केला. चॅनलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला फोन केला, त्या व्यक्तीने फोन उचलला. त्याला विचारलं की कारण काय? त्याने मला सांगितलं तु्झ्या राजकीय पोस्ट आणि एका महिलेची तक्रार.' 


माझ्याकडे त्या फोन कॉल्सचे रेकॉर्डिंग्ज आहेत - किरण माने


' मी तेव्हा एक फेसबुकवर पोस्ट केली. मला यातून बाहेर पडायचं होतं. धक्का बसला, वाईट वाटलं. मी दोन वर्ष ती भूमिका जगलो. मी कधीच कोणाला माजुर्डेपणाने बोललो नाही. मग हे काय आहे. मला एकदा सतीश राजवाडेंचा फोन आला, तेव्हा त्यांनी म्हटलं की, तुझ्याविषयी तक्रारी येत आहेत. पण मला माहितेय की खूप चांगलं काम करतोय. तु या मालिकेचा पिलर आहेस. ही मालिका तू खांद्यावर घेतली आहेस. या फोनचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे.'


'त्यानंतर चॅनलमधल्या एका माणसाचा मला फोन आला. त्यांनी मला विचारलं की किरण तुला सेटवर काही त्रास होतोय का? आम्हाला असं कळलंय की तुमच्या सेटवर ग्रुप झालेत आणि आम्हाला असं वाटतंय की, तुझ्यावर गँगअप होतोय. कारण तुझ्याविषयी आम्हाला तक्रारी येतायत. मी तेव्हा म्हटलं असं काही नाहीये, पण काही गोष्टी तिथे घडत होत्या,ज्या आक्षेपार्ह होत्या. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की  तुझ्या बाजूने मला एक मेल पाठव. तेव्हा मी तो मेल पाठवला, की अशा अशा गोष्टी चालत आहेत, पण त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी माझं काम व्यवस्थित करतोय. पण जे काही चाललं आहे ते मला बरोबर वाटत नाही', असं किरण मानेंनी स्पष्ट केलं.  


'मग मी लढायचं ठरवलं'


'दिग्दर्शकाकडून मला उचकवण्यात आलं, त्याचाही मी मेसेज मी चॅनल हेडला पाठवला. हे सगळं झाल्यानंतर मी लढायचं ठरवलं. पण एका चॅनलविरोधात लढणं हे एका कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट असते. त्यावर मग मी उघड उघड बोलायला सुरुवात केली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांवर खूप दबाब वाढला. त्यावर शरद पवारांचा मला फोन आला की, भेटायला या. त्यानंतर मी गेलो भेटायला. तिथून आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मला भेटायला बोलावलं. तेव्हा टिव्हीवर अचानक फ्लॅश व्हायला लागलं की, किरण मानेंनी महिलांशी गैरवर्तन केलं. त्यानंतर त्याविषयी बोलणं वैगरे झालं.'


'त्यावेळी एकीने सांगितलं की याने मला जाडी म्हटलं. मी त्यावर म्हटलं की, ठिक आहे, गैरवर्तन काय केलं. पण शेवटपर्यंत मी काय गैरवर्तन केलं हे कुणालाही सांगता आलं नाही. जितेंद्र आव्हाडांच्या सरकारी बंगल्यात आम्ही बसलो होतो. माझ्या बाजूने बोलणाऱ्या तिघी, चौघीही तेव्हा तिथे उपस्थित होत्या. तिथे सतीश राजवाडेंना बोलवण्यात आलं होतं. सतीश राजवाडेंनी अनेक आरोप झालेले सांगितले. त्यानंतर त्यांनाही पटलं की, हे आरोप खोटे आहेत, त्यावेळी जितेंद्र आव्हांसमोर त्यांनी मान्य केलं की, आमची चुकी झाली.  ते म्हणाले की ठीक आहे, प्रोडक्शन हाऊसची लोकं तुमच्या घरी येतील आपण हे मिटवून टाकू. त्यावेळी सत्ताधारी पक्षामध्ये अशी काही लोकं होती,ज्यांची प्रोडक्शन हाऊस आहेत, आणि त्यांनी सतीश राजवाडेंची बाजू घेतली', असा खुलासा  केला. 


'सध्या निवडणुकीच्या काळात मी काहीच नाही बोलणार'


पुढे किरण मानेंनी म्हटलं की,'अशाप्रकरणात अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत आणि माझ्याही मनात असे विचार आले होते. पण, मी मनाने खूप बळकट असल्याने ते प्रसंग मी टाळले. या प्रकरणात आणखी सुद्धा अनेक गुपितं आहेत पण, सध्या निवडणुकीच्या काळात मी काहीच नाही बोलणार…तेव्हा मला जो त्रास झाला त्याची भरपाई सहजासहजी होणार नाही. पण, मी ठरवलं होतं की, आपण स्वत: यातून बाहेर पडायचं. त्यानंतर मी आणखी एक मालिका केली, सिनेमे सुरू आहेत, आता आणखी एक मालिका करतोय…अनेक हिंदी वेबसीरिजसाठी विचारणा होतं आहे. पण, तो काळ प्रचंड वेदना देणारा होता.'