Kiran Mane :  मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये विविधरंगी भूमिका साकारणार आणि आपली मते सडेतोडपणे मांडणारा अभिनेता किरण माने (Kiran Mane) याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मला एका मोठ्या पक्षाकडून तिकिटासाठी विचारणा झाली होती असे किरण माने यांनी सांगितले. मी विचाराने विद्रोही असलो तरी द्रोही नाही असेही  किरण माने याने सांगितले. एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत किरण माने याने विविध प्रश्नांना बेधडक उत्तरे दिली.

यु्ट्युबवरील कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरण मानने सांगितले की, सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मला विचारणा झाली होती. भारतातील एका मोठ्या आणि जुन्या पक्षाच्या नेत्याने मला  उमेदवारीबाबत विचारले होते. त्याने सांगितलेला मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून उभा राहिलो असतो, जिंकलो असतो अथवा पराभव झाला असता तरी माझे नाव झाले असते. किरण मानेने पुढे सांगितले की, उमेदवारीबाबत विचारणा झाल्यानंतर मी त्या ऑफरला नकार दिला. मी विद्रोही आहे पण द्रोही नाही असेही अभिनेते किरण माने याने म्हटले. 

उमेदवारीबाबत उद्धव यांना सांगितले... 

किरण माने याने पुढे सांगितले की, या उमेदवारीच्या ऑफरची माहिती मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. मला उमेदवारी शिवसेना पक्षाकडून असती तर मी स्विकारली असती. पण, ती दुसऱ्या पक्षाची होती. उद्धव ठाकरे यांना मी तुम्हाला सोडून जाणार नाही असे म्हटले. मी विद्रोही असलो तरी  द्रोही नाही असे किरण माने याने या मुलाखतीत म्हटले. उमेदवारीच्या ऑफरबाबत सुषमा अंधारे आणि उमेदवारीची ऑफर करणाऱ्या पक्षाच्या नेत्याला याची कल्पना असल्याचेही किरण मानने स्पष्ट केले. 

शिवसेनेत का प्रवेश केला?

शिवसेनेत प्रवेश का केला, यावर बोलताना  किरण मानने सांगितले की, शिवसेनेत सरंजामी विचारसरणी नाही. बहुजनवादी विचारांच्या जवळ जाणारा  शिवसेना पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करताना मी उद्धव यांना प्रबोधन ठाकरे यांचे हिंदुत्व मान्य असून त्यांना पुढे घेऊन जाणार असल्याचे सांगितले.  त्यावर उद्धव यांनीही मीदेखील तोच विचार घेऊन जात असल्याचे सांगितले. मी राजकारणात आलो तरी मला कोणत्याही पदाचा हव्यास नसल्याचे किरण मानने स्पष्ट केले.