Kiran Mane Emotional Post : अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांच्या वडिलांची काही दिवसांपूर्वीच निधन झाले. दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर आता ते व्याख्यानासाठी बाहेर पडणार आहेत. अशा काळात घरात बसून राहणे हे माझ्या वडिलांनाही पटलं नसतं असं किरण मानेंनी म्हटलंय. त्यांनी एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट करुन दिलीये.
…माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी !
खूप धावपळ सुरू होती माझी. कोल्हापूरला इंद्रजीत सावंतांचा सत्कार झाला… नंतर चंद्रपूरला आंबेडकरी अस्मिता परिषदेसाठी गेलो. तिथून नागपूरला येऊन रात्री बाराच्या फ्लाईटनं पुणे एअरपोर्टवर उतरलो. दुसर्या दिवशीपासून नाशिकला शुटिंग सुरू होणार होतं. एक दिवसासाठी कशाला सातारला जायचं? शुटिंग संपल्यावर जाऊ सातारला, या विचारानं मी नाशिकला निघालोच होतो... पण बायकोच्या आग्रहाखातर अचानक निर्णय बदलला. गुढी पाडव्याच्या दिवशी सातारला घरी तीनचार तास थांबून मग नाशिकला जाऊ असं ठरवलं आणि सातारला आलो...
दादांच्या जवळ जाऊन बसलो. ते खुर्चीत शांत बसले होते. म्हटलं, "दादा मी नाशिकला चाललोय आजच लगेच." काही बोलले नाहीत. फक्त हातानं खुणावलं की 'शेजारी बस.' मी बसलो पण दादा काहीच बोलेनात. मला वाटलं त्यांना झोप आलीय. त्यांना बेडवर झोपवण्यासाठी मी आणि बायकोनं दोन्ही बाजूनं उचललं तर पायातला जीव गेल्यासारखे अलगद खाली बसले... माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शेवटचा श्वास घेतला.
ज्या शांतसरळ मार्गानं जगले, तसेच शांतपणे गेले
दादा, तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या असतील तर फक्त याच ठेवल्या की, ‘चांगला माणूस हो, पैसा कमव पण चुकीच्या मार्गाने कमावू नकोस, प्रामाणिकपणा सोडू नकोस, सत्य बोलायला घाबरू नकोस आणि गोरगरिबांना यथाशक्ती मदत कर !’दादा, काल तुमचे जुने मित्र आले होते… ते म्हणाले, “तुझ्या वडीलांकडे सुखी माणसाचा सदरा होता !” तो सदरा याच गुणांमुळे तुम्ही कमावला होतात दादा. आणि तोच तुम्ही वारशात ठेवला आहे. जगी ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तीस जावा ।। - किरण माने.
इतर महत्त्वाच्या बातम्या
