Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर सातत्याने भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका पाहायला मिळाली आहे. दरम्यान, आता त्यांची सिनेक्षेत्रातबाबतची पोस्ट चर्चेचा विषय बनलीये. किरण माने (Kiran Mane) यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ,दिवंगत अभिनेते निळू फुले आणि त्यांच्या आजीबाबतचा एक किस्सा लिहिलाय. किरण मानेंनी (Kiran Mane) पोस्टमध्ये काय लिहिलंय? जाणून घेऊयात..
किरण माने यांची संपूर्ण पोस्ट
"किरन, त्या अशोक सराफशी दोस्ती कर पन निळू फुल्याच्या नादाला लागू नगं..लै बेकार हाय त्यो...तस्ली संगत लै वंगाळ." ...सातार्यातल्या माझ्या घरी निळू फुले येऊन गेले हे कळाल्यावर आजी घाबरून म्हन्लीवती. तिला वाटलं आपला नातू बिघडला ! तिला सिनेमातलं सगळं खरं वाटायचं. कितीही समजाऊन सांगीतलं तरी पटायचं नाही तिला...
आजीला आम्ही 'काकी' म्हणायचो. आईची आई. लै माया केली तिनं माझ्यावर. सगळ्याच नातवंडांवर तिचा जीव होता. ल्हानपणी सुट्टीत आजोळला, बारामतीजवळ कोर्हाळ्याला जाताना मला एकच ओढ असायची ती म्हणजे तिच्या हातचा शिरा ! ती शिर्याला 'गरा' म्हणायची. माझ्या इतर भावंडांना पोहे लागायचे. पण काकी "माज्या किरन्याला गरा आवाडतो बया" म्हणत खास माझ्यासाठी वेगळा शिरा करायची. रोज. लै लाड करायची. भल्या पहाटे अंगणात बंब तापवून घंघाळ्यात गरम पाणी काढून आम्हाला अंघोळ घालण्यापासून रात्रीच्या जेवणापर्यन्त तिला अखंड राबताना पहायचो... रात्री मात्र गुडूप झोपेपर्यन्त आमच्याशी गप्पा मारत बसायची. जुन्या आठवणी सांगायची. आजोबांचा एक घोडा होता. तगडा. घोड्यावरुन ते बारामतीवरून सातारला जायचे. त्यांचे खूप किस्से सांगायची...आमची उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर परत निघताना मामा बैलगाडी तयार करायचे. गोनपाटात भात्यान भरून त्याची गादी टाकून, बैलं जुंपायचे. थोपटे वस्तीपास्नं स्टँडवर जायला बैलगाडी निघाली की काकींच्या डोळ्यातून आसवांच्या धारा सुरू व्हायच्या. आमच्याकडे बघत डोळे पुसत ती गाडीमागं लांब-लांबपर्यन्त चालत यायची. आम्ही 'टाटा' करत हात हलवायचो. गाडी दिसेनाशी होईपर्यन्त आमच्याकडे बघत बसायची...
सगळ्या सुना आणि नातसुनांशी काकींची घनिष्ट मैत्री होती ! एवढेच नव्हे तर शेजारपाजारच्या सुना आणि सासवांबरोबरही तिचे गुळपीठ होते. सगळ्यांच्या तक्रारी ऐकायच्या-समजुती काढायच्या, पण इकडचे तिकडे करायचे नाही. यामुळे सगळीकडे काकी 'लोकप्रिय'.बालपण आणि तरुणपण लै कष्टात आणि हलाखीत गेलं पण त्याची जर्राही खंत तिने कधी बोलून दाखवली नाही. बख्खळ आयुष्य लाभलं तिला. पोरांचं, नातवंडांचं अफाट वैभव बघितलं. पूर्वी बैलगाडीही नशिबात नव्हती, पण शेवटच्या काळात आलिशान कारमधनं फिरली. नातवंडांची मुलंबी तिच्या मांडीवर खेळली !
जवळजवळ दहा वर्ष उलटून गेली. मी मुंबईत होतो. नाटकाचे सलग प्रयोग लागले होते. प्रयोगाला जातानाच फोन आला 'काकी गेल्या'... मेंदू बधिर झाला. अस्वस्थ झालो. काकींचं अंत्यदर्शनही घेता येणार नाही या जाणीवेनं ढसाढसा रडलो. एकटाच. योगायोगानं त्यानंतर साताठ दिवसांनंतरच बारामतीजवळ एका ॲड फिल्मचे शूटिंग होते. ते संपवून मामाकडं गेलो. सतत उत्साहानं सळसळणारं माझं आजोळ पहिल्यांदा एवढं उदास आणि भकास पाहिलं मी. सगळं होतं पण माझी काकी नव्हती ! ...खरंतर माणूस गेल्यावर महिनाभर तरी घरात गोडधोड करत नाहीत पण मामींनी माझ्यासाठी शिरा केला ! म्हणाल्या "लाडका नातू आलाय. 'गरा' केला नाही तर काकींना बरं वाटंल का?"
...डोळे भरुन आले. गळा दाटून आला. घास घशाखाली उतरेना. ...हा जुना फोटो आज अचानक फेसबुकनं वर काढला. काकी जाण्यापूर्वी चार महिने आधी काढलेला. काकींचा 'बर्थ डे' साजरा केला होता आम्ही. वयाची नव्वदी पार झाली होती. त्या काळात 'जन्मतारखा' कुठल्या माहिती? असाच मजेमजेत आम्ही वाढदिवस केला. ओवाळले. केक कापला... 'फोटू' काढला... हा तोच फोटो.. शेवटचा !
इतर महत्त्वाच्या बातम्या
lagaan फेम अभिनेत्री सध्या कुठे आहे? ग्रेसीने बॉलिवूड का सोडलं? वयाच्या 44 व्या वर्षीही अविवाहित