Maharashtra State Film Awards: राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात (Maharashtra State Film Awards) मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी करण्यात आली. 'खालिद का शिवाजी' सिनेमाला विरोध करत दोघांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी इतिहासाचं विकृतीकरण बंद करा अशी मागणी या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. दरम्यान, तुमचं म्हणणं ऐकलं, आता कार्यक्रम खराब करु नका, असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आलं. सीबीएफसीनं या चित्रपटाला हिरवा कंदील दिलाय, त्यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी आशिष शेलार यांनीही केलीय.
महाराष्ट्रात 'खालिद का शिवाजी' (Khalid Ka Shivaji) नावाच्या चित्रपटाचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी संध्याकाळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या राज्य चित्रपट पुरस्कार कार्यक्रमात, या चित्रपटाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांचं भाषण मध्येच थांबवावं लागलं. या घटनेनंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील वरळी एनएससीआय डोम इथे महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं. या सोहळ्यादरम्यानच ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण देण्यासाठी व्यासपीठावर उभे राहताच, एका हिंदू संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी 'खालिद का शिवाजी' चित्रपटाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. हे लोक चित्रपटावर बंदी घालण्याची आणि त्यातील कथित आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्याची मागणी करत होते. अचानक झालेल्या या गोंधळामुळे संपूर्ण कार्यक्रमात काही काळ गोंधळ उडाला.
परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप केला. त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि म्हणाले की, "मी तुमचं ऐकलं, आता कार्यक्रम खराब करू नका..." पण मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही कोणी ऐकलं नाही, त्यानंतर मात्र पोलिसांना कारवाई करावी लागली. पोलिसांनी तातडीनं तिथे जाऊन घोषणा देणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रमस्थळाबाहेर काढलं. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही काळासाठी आपलं भाषण थांबवावं लागलं.
'खालिद का शिवाजी' सिनेमाला का होतोय विरोध?
'खालिद का शिवाजी' सिनेमाला विरोध होण्याचं कारण, नाव आणि त्याची कथित कथा आहे. निषेध करणाऱ्या हिंदू संघटनांचा असा विश्वास आहे की 'खालिद का शिवाजी' मध्ये निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत. त्यांचा आरोप आहे की, या चित्रपटाद्वारे समाजात जातीय तणाव आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. या संघटनांचं म्हणणं आहे की, जर इतिहास चुकीच्या पद्धतीनं दाखवला गेला तर समाजात वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :