Kareena Kapoor Saif Ali Khan Baby अभिनेत्री करीना कपूर खान, अर्थात हिंदी कलाविश्वातील 'बेगम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीच्या घरी तिच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. अभिनेता सैफ अली खान आणि करीनाला दुसरा मुलगा झाला आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये अतिशय आनंदानं कपूर आणि खान परिवारानं त्यांच्या बाळाचं स्वागत केलं. करिनाला दुसरा मुलगा झाल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं आहे. करिनाला मुलगा झाला आहे. यामुळं आम्ही सर्वजण फार आनंदात आहोत. तिनं दुसर्या मुलाला ब्रीच कॅंडी रुग्णालयात जन्म दिला आहे, आम्ही तिकडे जात आहोत, असं रणधीर कपूर यांनी सांगितलं. आज सकाळी 9 वाजता तिनं बाळाला जन्म दिला असल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं.
हिंदी कलाविश्वातील एक नावाजलेली आणि तितकीच चर्चेत असणारी ही जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होण्याचं सुख अनुभवत आहे. यापूर्वी त्यांना तैमूर हा एक मुलगा आहे.
भारतीय चित्रपट जगतामधील प्रतिष्ठीत अशा कपूर कुटुंबातील लेक करीना आणि नवाबांच्या कुटुंबातील सैफ अली खान या सेलिब्रिटी जोडीच्या बाळाची बातमी कळताच सोशल मीडियापासून ते अगदी मित्रमंडळींच्या वर्तुळापर्यंत सर्वच ठिकाणहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहेत. अनेक सेलिब्रिटी किड्सप्रमाणंच करिनाच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माचा विषयही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला आहे. इतकंच नव्हे, तर बाळाचं नाव, नवी ओळख, नावामागचं कारण अशा अनेक चर्चांना आतापासूनच उधाण येण्यास सुरुवात झाली आहे.
बाळाच्या जन्मानंतर सैफ अली खान सुट्टीवर
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेता सैफ अली खान यानं त्याच्या आगामी चित्रपट, सीरिज आणि चित्रीकरणाच्या सर्व कामांतून सुट्टी घेण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. आपल्या नवजात बाळासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याला सैफ दरम्यानच्या काळात प्राधान्य देणार आहे.
मातृत्त्वाचा अवुभव घेणारी करीना ही तिच्या गरोदरपणाच्या काळात अनोख्या स्टाईल स्टेटमेंटमुळं चर्चेत होती. मैत्रीणींसमवेत वेळ व्यतीत करण्यापासून ती या काळात कुटुंबासोबतच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत होती. त्यामुळं करीना एका वेगळ्याच अंदाजात चाहत्यांची मनंही जिंकत होती.