Mahendra Bohra passes away: मनोरंजन सृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील, प्रसिद्ध निर्माते महेंद्र बोहरा यांचे निधन झाले आहे. होळीच्या दिवशी त्यानं ही दु:खद बातमी शेअर केली. अभिनेत्यानं सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करुन आपल्या वडिलांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मित्र कलाकार तसेच चाहत्यांनी पोस्टवर कमेंट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या करणवीर बोहराची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
करणवीर बोहराने आपल्या वडिलांच्या जुन्या फोटोंचा वापर करुन सुंदर व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. या पोस्टला त्यानं लांबलचक आणि भावनिक कॅप्शन देखील दिलं आहे. ज्यामध्ये त्याच्या वडिलांनी करणवीरच्या आयुष्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावली आणि अडचणीत सावलीप्रमाणे त्याच्या पाठीशी कसे उभे राहिले, याचे वर्णन केले आहे. सध्या अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
करणवीर बोहराच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. करणवीरनं आपल्या इनस्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. शब्दांत मला व्यक्त करता येणार नाही. मला इतकी तुमची आठवण येत आहे. ज्यांनी आपले पालक गमावले आहे, त्यांना ही बाब किती वेदनादायी आहे, हे ठाऊक असेल. पण काही दु:खाच्या क्षणीही तु्म्ही आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगलात, याचं मला समाधान आहे. तुम्ही दीदीला आणि मला खरोखर महत्त्वाच्या असलेल्या सर्व गोष्टी शिकवल्या आहेत'.
'तुम्ही मला स्वप्नं बघायला शिकवलं. निर्माते ते अॅक्टर बनायला शिकवलं. शॉट पू्र्ण न झाल्याशिवाय सेट न सोडायला शिकवलं. तुम्ही दयाळू असायला शिकवलं. तुम्ही मला तुमच्यासारखेच सन्मानाने वागायला शिकवलं. तुमच्याबद्दल कौतुक करताना प्रत्येक व्यक्ती, तुम्ही किती चांगले होता, हे सांगतात. मला आणि दीदीला कायम अभिमान वाटेल, आम्ही तुमची मुलं आहोत. माझं सर्वस्व तुमच्यासाठी.. तुम्ही आता तुमच्या पुढील प्रवासासाठी जा.. मी सगळं नीट सांभाळेन...' , असं म्हणत अभिनेत्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या.
