Kapil Sharma caps cafe canada firing again : कॅनडाच्या Surrey शहरात कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा यांच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलाय. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. काही आठवड्यांपूर्वी कपिलच्या याच कॅफेवर बिश्नोई गँगने हल्ला केला होता. त्यामुळे सिद्धू मुसेवालानंतर बिश्नोई गँगने कपिल शर्माला टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. परदेशात कॅफेवर हल्ला करण्यात आल्यानंतर कपिल शर्मावर मुंबईत हल्ला करण्याची धमकी देखील देण्यात आलीये.  

गोळीबारानंतर गोल्डी ढिल्लों नावाच्या एका सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्ट व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे. “जय श्रीराम. सतश्रीअकाल. राम राम सगळ्या भावांना. आज जो कपिल शर्मा यांच्या कॅप्स कॅफे, सरे येथे गोळीबार झाला, त्याची जबाबदारी मी गोल्डी ढिल्लों, लॉरेन्स बिश्नोई गँग घेत आहोत.” व्हायरल पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे ,“याला आम्ही फोन केला होता, पण याने ‘रिंग’ ऐकली नाही, म्हणून कारवाई करावी लागली. आता सुद्धा रिंग ऐकली नाही तर पुढची कारवाई लवकरच मुंबईत करू.” मुंबई पोलीस हे धमकीचे सोशल मीडिया पोस्ट सत्य आहे का याची पडताळणी करत आहेत.

 कपिल शर्माच्या कॅफेवर 6 राउंड फायर

कपिल शर्मा यांच्या कॅफेवर यावेळी 6 राउंड गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. घटनेनंतर Surrey पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका महिन्यातच कॅप्स कॅफेवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. मागील वेळी झालेल्या गोळीबारात तेथील पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

यापूर्वी कधी झाला होता गोळीबार?

मागच्या महिन्यात कपिल शर्मा याच्या कॅनडातील कॅप्स कॅफेवर काही आठवड्यांपूर्वी मध्यरात्री साधारण 1.30 वाजता अंधाधुंद गोळीबार झाला होता. त्या हल्ल्यातही कोणीही जखमी झाले नव्हते. त्या वेळीही हल्लेखोरांनी स्वतःचा एक व्हिडिओ जाहीर केला होता. हल्ल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत कॅफे पुन्हा सुरू करण्यात आला होता. त्या वेळी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बब्बर खालसा इंटरनॅशनलचा कार्यकर्ता आणि भारतातील सर्वाधिक वाँटेड व्यक्तींपैकी एक हरजीत सिंह लाडी याने स्वीकारली होती.

सध्या कपिल शर्मा काय करत आहेत?

सध्या कपिल शर्मा आपला कॉमेडी शो द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये व्यस्त आहेत. या शोचा दुसरा सीझन सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. आतापर्यंत या सीझनचे अनेक भाग प्रदर्शित झाले आहेत. पुढील भागात शिल्पा आणि शमिता शेट्टी, तसेच हुमा कुरैशी आणि साकिब सलीम दिसणार आहेत. हा भाग येत्या शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Huma Qureshi Brother Murder: अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची हत्या; स्कूटी पार्किंगवरून वाद, दोघांनी मिळून केला धारदार शस्त्राने वार