Kangana Ranaut: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने लग्नासाठी धर्म बदलणाऱ्या अभिनेत्रींबाबत भाष्य करत हिंदू मुलींनाही समान स्वातंत्र्य मिळायला हवे, अशी भूमिका मांडली आहे.अलीकडेच जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या Gen Z आणि तरुण पिढीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कंगना चर्चेत होती. आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत धर्म, विचारधारा आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे.
काय म्हणाली कंगना?
व्हिडिओमध्ये कंगना रनौत म्हणाली, "मी संसदेसाठी उशीर करत आहे, तरीही माझे विचार आणि भावना तुमच्यासोबत शेअर कराव्यात असे वाटले. आज सकाळी काही पोस्ट करत असताना मला आपल्या चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीबद्दल विचार आला. चित्रपटसृष्टीत अनेक हिंदू मुली अशा आहेत, ज्यांना राजकारण किंवा धर्माबाबत ठाम विचारधारा नसते."
ती पुढे म्हणाली, "विशेषतः तरुणांमध्ये हे अधिक दिसून येते. ते स्वतःला तटस्थ समजतात. मात्र, एखाद्या इस्लामिक विचारसरणीच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर, मग ती मैत्री असो, लग्न असो किंवा अन्य कोणतेही नाते, त्यांच्या विचारांमध्ये मोठा बदल होतो. ते अधिक ठाम भूमिका घेतात. यात काही चुकीचे नाही, कारण भारतीय राज्यघटना प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार धर्म किंवा विचारसरणी स्वीकारण्याचा अधिकार देते. मात्र, हिंदू मुलींचा प्रश्न आला की वेगळे निकष लावले जातात."
'मलाही हिंदुत्व स्वीकारायचे आहे'
कंगना रनौत पुढे म्हणाली, "आता मी स्वतःचा बचाव करणार नाही की मी आयटम साँग केले होते. मी नेहमीच एक मध्यममार्गी हिंदू होते. पण आज जर मी स्वतःचा बचाव केला, तर अनेक मुली पुढे येऊ शकणार नाहीत. आज माझ्यावर प्रश्न उपस्थित केला जातो की, 'तू संघाची कधीपासून झालीस?' हो, मला संघाचं व्हायचं आहे. मला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी जोडले जायचे आहे. मला कन्वर्ट करायचे आहे. मग मी ते का करू शकत नाही?"
ती म्हणाली, "समाजातील हा दुटप्पीपणा मला मान्य नाही. हिंदू मुलींचा विषय आला की समाजातील काही ठेकेदार आमच्या जुन्या गोष्टी उकरून काढतात. 'तू पार्टी करत होतीस, हे करत होतीस', असे म्हणतात. हो, मी ते सगळे केले होते. पण आज मला जागरूक हिंदू म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. मग माझ्यासाठी हा मार्ग बंद का असावा? हिंदू मुलींनाही स्वतःची विचारधारा स्वीकारण्याचे समान स्वातंत्र्य असले पाहिजे."कंगना रनौतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले असून काहींनी तिच्या वक्तव्यांवर टीकाही केलीय. अनेकांनी तिने सोनाक्षी सिन्हावर निशाणा साधल्याचंही म्हटलं.
