Kangana Ranaut On Media: विद्यार्थ्यांच्या आंदोलनांबाबत (Student Protest) अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) हिनं केलेल्या वक्तव्याचा वाद अधिकच चिघळत चालला आहे. अशातच आता, कंगनानं आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक व्हिडीओ जारी केला आहे. तिनं स्पष्ट केलंय की, तिनं केवळ काही आंदोलकांच्या वर्तनावर आक्षेप घेतला होता. लहान मुलं, वृद्ध आणि महिलांच्या उपस्थितीत रस्त्यावर असभ्य भाषेचा वापर आणि अयोग्य कृती करणं ही सामान्य बाब मानली जाऊ शकत नाही, असं तिनं नमूद केलं आहे. तिनं माध्यमांवरही टीका केली असून म्हटलंय की, तिच्या वक्तव्याचा केवळ एकच भाग हायलाइट केला जातोय, तर दुसरीकडे तिनं अनेक प्रसंगी तरुण आणि विद्यार्थ्यांचंही कौतुक केलंय.

Continues below advertisement

अभिनेत्री कंगना रनौत नेमकं काय म्हणाली? (Kangana Ranaut On Trolling)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली की, "नमस्कार मित्रांनो... मी ही 'रील' प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी बनवतेय, कारण लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठांच्या उपस्थितीत घडणाऱ्या 'अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना 'सामान्य' मानण्यास मी साफ नकार देते... समाजात अशा वर्तनाला अजिबात स्थान नाही आणि आपल्या मुलांना अकाली अश्लीलतेच्या वातावरणात ढकललं जाणं, आम्ही कदापी सहन करणार नाही..."

Continues below advertisement

कंगनानं जेन-झींना 'गटार छाप' बोलल्यानंतर तिला लक्ष्य करण्यासाठी माध्यमं एकत्र आलीत, असा आरोप केलाय. कंगना म्हणाली की, "टीआरपी (TRP), लाइक्स आणि व्ह्यूजच्या नादात प्रसारमाध्यमं माझ्या सकारात्मक वक्तव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. मी 'स्कायरूट एरोस्पेस'च्या (Skyroot Aerospace) कामगिरीचं कौतुक केलंय. तसेच, मी 'नीट' (NEET) परीक्षा देणारे विद्यार्थी आणि 'जेन-झी' (Generation Z), म्हणजेच देशाला पुढे नेणारी पिढी,  यांचंही कौतुक केलं आहे..."

तथाकथित स्त्रीवादी, न्यूज अँकर्स मला शिस्तीचे धडे देण्याचा प्रयत्न करतायत... : कंगना रनौत

व्हिडीओमध्ये कंगनानं त्यांच्यावरही वक्तव्य केलंय ज्यांनी तिच्या वक्तव्यावरुन तिच्यावर टीका केलीय. कंगना म्हणालीय की, माझ्या लक्षात आलंय की, "काही तथाकथित स्त्रीवादी आणि न्यूज अँकर्स मला शिस्तीचे धडे देण्याचा प्रयत्न करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या भावना, श्रद्धा किंवा समजुती दुखावणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. जिथे दुसऱ्या व्यक्तीची गोपनीयता आणि प्रतिष्ठा सुरू होते, तिथे तुमचे वैयक्तिक स्वातंत्र्य संपते. मग ते आपले आई-वडील असोत, आपले पूजनीय देव-देवता असोत किंवा पंतप्रधान, अशा व्यक्ती ज्यांच्याशी मुलांचं भावनिक नातं असतं, तुम्ही कोणाचाही सार्वजनिकरीत्या अपमान करू शकत नाही. हा विषय 'कूल' दिसण्याचा नाही, तर मूलभूत समजुतीचा आहे..."

समाजात वावरताना योग्य आचरणाचे नियम पाळणे आवश्यक आहे, असं तिनं नमूद केलंय. कंगना म्हणाली की, "अश्लील किंवा असभ्य वर्तन कदाचित बंद दाराआड मर्यादित राहू शकते. मात्र, जर तुम्ही समाजात किंवा कामाच्या ठिकाणी सभ्यतेचं भान राखलं नाही, तर तुम्हाला बहिष्कृत केलं जाईल आणि तुमचं भविष्य अंधारानं झाकोळलं जाईल. विज्ञान आणि धर्मग्रंथ दोन्ही हेच शिकवतात की, मानवी जीवनाचा उद्देश 'प्रगती' करणं, म्हणजेच स्वतःचा विकास करणं, हा आहे; स्वतःवरील ताबा गमावून अशा मार्गावर चालणं नव्हे, जो शेवटी तुरुंगात घेऊन जातो. आपण अधिक चांगली आणि उदात्त माणसं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे..."

व्हिडीओच्या शेवटी कंगना म्हणाली की, "आपल्याला हे जीवन प्रगती करण्यासाठी मिळालंय. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आपल्या गुरूंच्या ज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली योग्य मार्गाचे अनुसरण करा आणि अधिक चांगले बनण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल