मुंबई : कंगना रनौतचे सध्या चर्चेतले जे चित्रपट आहेत, त्यातला एक महत्वाचा सिनेमा आहे थलैवी. अभिनेत्री आणि त्यानंतर लोकनेत्या बनलेल्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात कंगना रनौत जयललिता यांची भूमिका साकारते आहे. हा चित्रपट अनेक काळापासून चर्चेत आहे. भारतभरात या सिनेमाची चर्चा आहेच. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब अशी की दक्षिणेत हा चित्रपट कसा स्विकारला जातो याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.


थलैवी खरंतर थोडा लांबला. या सिनेमाची घोषणा झाली होती 2019 मध्ये. त्यानंतर मार्च 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनने मात्र जरा गोंधळ केला. हा सिनेमा लांबला. याचं चित्रिकरण लांबलं. त्यामुळे सिनेमाही पुढे गेला. सिनेमाचं सगळं शूट होऊन हा चित्रपट आता पूर्ण झाला आहे. शिवाय तो सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सेन्सॉर बोर्डाकडे गेला आहे. विशेष बाब अशी की बोर्डाने कोणतेही कट न सुचवता हा चित्रपट पास केला आहे. हा बोर्ड तामीळ भाषेसाठीचा आहे. अजून हिंदी चित्रपटासाठी हिंदी बोर्डाने काय निर्णय घेतला आहे ते कळायला मार्ग नाही. 


सध्या निर्मात्यांनी तामीळ बोर्डाकडे चित्रपट दिला होता. त्यांनी कोणत्याही कटविना यू सर्टिफिकेट दिल्यानंतर थलैवीच्या निर्मात्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता तेलुगु आणि हिंदी या दोन्ही भाषांसाठी लागणाऱ्या बोर्डाकडेही ही फिल्म देण्यात येणार आहे. त्यानंतर ते बोर्ड त्या त्या भाषेत कोणतं प्रमाणपत्र द्यायचं ते ठरवतील. या वृत्ताबद्दल हिंदी बोर्डात काम करणाऱ्या सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एबीपी माझाला सांगितलं, थलैवीला तामीळमध्ये यू प्रमाणपत्र मिळालं हे खरं आहे. पण याचा अर्थ हिंदीतही तेच प्रमाणपत्र मिळेल असं नाही. ही फिल्म डब कशी झाली आहे, त्यात काही आक्षेपाह्र संवाद, शब्द नाहीत ना हे पाहावं लागेल. बऱ्याचदा सीनला कात्री लागत नाही, पण संवादांना लागते. ते पाहून निर्णय घ्यावा लागेल. 


असं असलं तरी एका बोर्डाने यू सर्टिफिकेट दिल्यानंतर थलैवीसमोरच्या अडचणी संपल्या आहेत. आता गरजेच्या सर्व बोर्डाकडून यू सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सिनेमा कसा रिलीज करायचा यावर चर्चा होणार आहे.