Kangana Ranaut Queen Co Star Navnindra Behl Dies: 'इश्कबाज' (Ishqbaaaz) आणि 'क्वीन' (Queen) सिनेमांमधल्या  आपल्या धमाकेदार भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नवनींद्र बहल (Navnindra Behl) यांचा वयाच्या 76व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा आणि सिनेनिर्माते कानू बहल (Kanu Behl) यांनी दुजोरा दिलाय. त्यांनी सोशल मीडियावर नवनींद्र बहल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत त्यानं एक इमोशनल मेसेजही शेअर केला आहे. 

Continues below advertisement

दिग्गज अभिनेत्री नवनींद्र बहल यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यापासून सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरही त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. नवनींद्रा यांनी आपली लग्नगाठ ज्येष्ठ अभिनेते आणि सिनेनिर्माते ललित बहल यांच्याशी बांधली होती. ललित बहल यांचं 2021 मध्ये दिल्ली इथे कोविड-19 मुळे निधन झालेलं. 

Continues below advertisement

नवनींद्रा बहल यांच्या निधनामुळे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

दिग्गज अभिनेत्री नवनींद्र बहल यांच्या जाण्यानं बहल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिनेनिर्माते कानू बहल यांनी आपल्या आई नवनींद्र बहल यांचा एक फोटो शेअर करत लिहिलंय की, "माझी ताकद, माझा विश्वास, माझं प्रेम, माझी मार्गदर्शक, माझी गुरु, माझं हृदय, अलविदा आई... जोपर्यंत तू मला पुन्हा जन्म देत नाहीस, तोपर्यंतसाठी..." आपल्या आईच्या प्रेमळ आठवणी ताज्या करत कानू बहल यांनी लिहिलंय की, "माझे डोळे त्या उत्स्फूर्त हास्याला, त्या प्रेमळ खळखळाटाला, त्या मायेच्या मिठीला आणि नेहमीच चमकणाऱ्या त्या कुतूहलपूर्ण नजरेला कायमच शोधत राहतील... माझ्या आत्म्याला प्रकाशमान केल्याबद्दल तुझे आभार..."

सेलिब्रिटींकडूनही आदरांजली 

सिनेनिर्माते कानू बहल यांच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत आदरांजली वाहिली आहे. फिल्मी जगतातील अनेकांनी त्यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. फिल्ममेकर अनुराग कश्यप आणि अभिनेते अंशुमन झा, आहना कुमरा, रसिका दुगल आणि हर्षवर्धन कपूर यांनीही दिवंगत अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. 

नवनींद्र बहल यांची सिनेसृष्टीतील बहारदार कारकीर्द

नवनींद्र बहल यांनी थिएटर, टेलिव्हिजन आणि फिल्म्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासूनच त्यांनी रंगमंचावर अभिनयाची उजळणी करायला सुरुवात केली. त्यानंतर त्या अनेक दशकं मनोरंजन क्षेत्रात सक्रिय राहिल्या. गुलजार दिग्दर्शित 'माचिस', दिबाकर बॅनर्जी यांचा 'ओये लकी! लकी ओये!' आणि कंगना रनौत यांची प्रमुख भूमिका असलेला 'क्वीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलंय. 'द प्राइड' आणि 'द गुरू' यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्सचाही त्या एक भाग होत्या. 'इश्कबाझ' आणि 'दिल बोले ओबेरॉय' या मालिकांमध्ये नकुल मेहताच्या पात्राच्या आजीची भूमिका साकारल्यामुळे दूरदर्शनवरील प्रेक्षक त्यांना आजही स्मरतात. याव्यतिरिक्त, 'विजी' आणि 'सदा-ए-वादी' यांसारख्या मालिकांमध्येही त्या झळकलेल्या.