Kangana Ranaut chirag Pasvan: नशिबात पुन्हा एकत्र येणं लिहिलेलं असेल तर माणसं भेटतातच. असंच काहीसं केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांच्या बाबतीत घडलं. मंगळवारी एनडीएच्या बैठकीपूर्वी कंगना रनौत (kangna Raunt) आणि चिराग पासवान (Chirag Pasvan) यांची भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या हसतमुख भेटीने आणि सहज संवादाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघांमधील ‘केमिस्ट्री’ स्पष्टपणे दिसत असून, व्हिडीओ व्हायरल होताच यावर चर्चांना उधाण आलं आहे.
मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत एनडीएच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान कंगना रनौत आणि चिराग पासवान पुन्हा एकदा एकत्र दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघंही कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र येताना आणि हसतमुखाने एकमेकांची भेट घेताना दिसत आहेत.
संसदेत भेटले कंगना-चिराग
कंगना रनौत आणि चिराग पासवान यांनी 2014 साली प्रदर्शित झालेल्या ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या सिनेमात चिरागने टेनिस खेळाडूची भूमिका साकारली होती, जो कंगनाच्या भूमिकेच्या प्रेमात पडतो. हा चिरागचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात नीरू बाजवा आणि सागरिका घाटगेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.
अभिनयातून राजकारणात
अभिनयानंतर आता कंगना आणि चिराग दोघंही राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. एनडीएच्या संसदीय बैठकीसाठी ते एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षीदेखील अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये कंगना चिरागला पाहून आनंदी झाली होती आणि हस्तांदोलनानंतर त्याच्याशी गप्पा मारताना दिसली होती.
कंगनाबद्दल चिरागचं मत
एका जुन्या मुलाखतीत चिराग पासवान यांनी कंगना रनौतबद्दल मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते की, कंगना आपलं मत मोकळेपणाने मांडते आणि राजकीयदृष्ट्या योग्य असो वा नसो, ती तिचं मत ठामपणे बोलते. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, कंगना अनेकदा ‘पॉलिटिकली करेक्ट’ नसते आणि हीच गोष्ट तिची खासियत आहे. जेव्हा कुणीतरी मध्येच सांगितलं की कंगना मनातलं तेच बोलते, तेव्हा चिराग यांनी त्याला होकार देत हीच गोष्ट त्यांना आवडते असं स्पष्ट केलं होतं.
व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया
कंगना रनौत आणि चिराग पासवान यांना एकत्र पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर अनेकांनी दोघांनाही ‘पॉवरफुल लीडर्स’ म्हणत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हार्ट इमोजी शेअर करत दोघंही आपले फेव्हरेट असल्याचं लिहिलं आहे. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा कंगना-चिराग जोडी चर्चेचा विषय ठरली आहे.
