Kajalmaya Marathi Serial : मालिकाविश्वात आणखी एक रहस्यमय आणि थरारक मालिका येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर काजळमाया ही मालिका पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहेत. येत्या 27 ऑक्टोबरपासून ही मालिका प्रसारित होणार आहे. मालिकेच्या अनाउंसमेंटच्या निमित्ताने 14 ऑक्टोबर रोजी स्टार प्रवाहतर्फे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्टार प्रवाहचे सीईओ सतिश राजवाडे, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार उपस्थित होते.
मालिकेची कहाणी नेमकी काय?
सतिश राजवाडे यांनी सांगितले की, "काजळमाया हे नाव ऐकतानाच भीतीदायक वाटतं. मालिकेची कथा देखील तितकीच रहस्यमय आणि थरारक आहे. ही मालिका प्रेक्षकांसाठी एक धक्कातंत्र ठरेल. प्रत्येक भागानंतर आता पुढे काय होणार हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण व्हावा, उत्सुकता ताणली जावी, हेच आमचं ध्येय आहे."
पर्णिकाच्या भूमिकेत कोण?
चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका. या मालिकेतून रुची जाईल ही प्रथमच पदार्पण करत आहे. रुची नुकतीच श्रावण क्वीन स्पर्धेची विजेती ठरली असून ती तिच्या पहिल्यावहिल्या मालिकेसाठी अतिशय उत्सुक आहे. तिच्यासोबत अक्षय केळकर आणि वैष्णवी कल्याणकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि प्रिया बेर्डे हे देखील एका वेगळ्या भूमिकेत दिसतील.
हॉरर प्रकारातील ही पहिली मोठी मालिका
'सांग तू आहेस का?' या मालिकेनंतर स्टार प्रवाहवर हॉरर प्रकारातील ही पहिली मोठी मालिका असणार आहे. त्यामुळे काजळमाया प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडेल असा विश्वास संपूर्ण टीमला आहे.
मालिका प्रेक्षकांसाठी धक्कातंत्र असेल : राजवाडे
सतीश राजवाडे पुढे म्हणाले की "ही मालिका प्रेक्षकांसाठी एक धक्कातंत्र असणार आहे, मालिका पाहत असताना उद्या काय होईल हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात यायला हवा, या सर्व बाबी लक्षात घेऊन मालिकेवर काम करण्यात येईल. मला या पूर्ण टीमचं कौतुक करायचंय, आपण कित्येक मालिकांचं सादरीकरण पाहतो पण एखाद्या मालिकेचं याप्रकारे केलेलं सादरीकरण (curtain raisal) म्हणजे खरच आश्चर्याची गोष्ट आहे. आपण क्वचीतच अशा गोष्टी पाहतो, अशा प्रकारे लॉन्च इव्हेंट करण्यात येईल मलाही माहिती नव्हतं हे माझ्यासाठीही एक धक्कातंत्र होतं, या सादरीकरणामुळे मालिकेचा जॉनर काय असणार आहे हे खूप छान प्रकारे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचलंय असं मला वाटतं"
Kajalmaya star pravah new serial VIDEO :