Johnny Lever : जॉनी लिव्हर यांनी चित्रपटसृष्टीत चाळीस वर्षांहून अधिक काळ घालवला असून, या प्रवासात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. एका काळात ते बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी विनोदी कलाकारांपैकी एक मानले जात होते. अलीकडेच एका मुलाखतीत जॉनी लीवर यांनी खुलासा केला की, त्यांच्या करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांना दारूचे व्यसन लागले होते आणि ते मुंबईच्या चौपाटीवर पहाटे चार वाजेपर्यंत दारू पीत असत.
17 वर्षांच्या वयात आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जॉनी लिव्हर यांनी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अवघ्या सहा वर्षांत ते प्रत्येक घराघरात ओळखले जाऊ लागले होते आणि त्यांच्या अभिनयाच्या सीडी अमेरिकेतसुद्धा विकल्या जात होत्या. त्यांनी अनेक चित्रपट साइन केले होते, जगभरात कॉमेडी शो केले आणि आपल्या स्वप्नांसारखे आयुष्य जगत होते. मात्र, या सर्वासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली.
दारूच्या आहारी गेले होते जॉनी लिव्हर
कॉमेडियन सपन वर्मा यांच्या यूट्यूब शोमध्ये त्यांची मुलगी जेमीसोबत सहभागी झालेले जॉनी लिव्हर यांनी यशामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि जीवनशैलीवर कसा विपरीत परिणाम झाला, याबाबत सांगितले. "मी खूप थकून जायचो. दिवसा चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असायचो आणि रात्री शोमध्ये परफॉर्म करायचो. तेव्हा मी खूप जास्त दारू प्यायचो. त्यामुळे मी पूर्णपणे थकून जात होतो. मी बॅकस्टेज अशा अवस्थेत बसलेलो असायचो जसं शवासन करत आहे. मी नेहमीच माझा परफॉर्मन्स दिला आहे, मग मी कितीही थकलेलो असो. पण, शो झाल्यावर माझ्यात काहीच शक्ती उरत नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.
चौपाटीवर बसून पहाटे 4 वाजेपर्यंत दारू प्यायचो; जॉनी लिव्हर यांचा खुलासा
यानंतर जॉनी लिव्हर यांनी आपल्या प्रेक्षकांना एक गंभीर इशारा दिला. त्यांनी सांगितले, "मी लोकांना विनंती करतो की मर्यादेत प्या. मी माझी मर्यादा ओलांडली होती. ते काहीच फायदेशीर नव्हतं. मी पूर्णपणे दारूच्या आहारी गेलो होतो. मी चौपाटीवर बसून पहाटे चार वाजेपर्यंत दारू पित असे. अनेकदा पोलीस यायचे, पण जेव्हा ते मला ओळखायचे, तेव्हा हसत म्हणायचे, 'अरे, जॉनी भाई!' आणि मग मला त्यांच्या गाडीत बसू द्यायचे, जेणेकरून मी सुरक्षितपणे दारू पिऊ शकेन," असा खुलासा त्यांनी केला आहे.
24 वर्षांपासून दारूला हातही लावलेला नाही
त्याच शोमध्ये जॉनी लिव्हर यांनी कबूल केलं की, "यश तुमचं मानसिक संतुलन ढवळून टाकू शकतं. एक काळ असा होता की माझ्याशिवाय कोणताही चित्रपट बनत नव्हता. मी आंतरराष्ट्रीय शो देखील करत होतो आणि सतत प्रवासात असायचो. या सगळ्यात मी पूर्णपणे हरवून गेलो होतो. पण शेवटी मी एक ठाम निर्णय घेतला आणि मी दारू पिणं सोडलं. आता 24 वर्षे झाली आहेत. मी दारूला हातही लावलेला नाही," असे त्यांनी म्हटले आहे. तर जॉनी लिव्हर यांनी हेही स्पष्ट केलं की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली व्यावसायिक शिस्त कधीही ढळू दिली नाही. त्यांनी सांगितलं, "एक गोष्ट मी अभिमानाने सांगू शकतो की, मी कधीच नशेत परफॉर्म केलं नाही. मी कधीही कोणत्याही शोच्या आधी दारू प्यायलो नाही."
दरम्यान, अलीकडच्या काही वर्षांत जॉनी लिव्हर यांनी आपल्या भूमिका निवडताना खूपच निवडक भूमिका स्वीकारायला सुरुवात केली आहे. या वर्षी ‘बैडएस रवि कुमार’, ‘बी हैप्पी’ आणि ‘हाऊसफुल 5’ या तीन चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. याशिवाय त्यांचा आणखी एक चित्रपट "वेलकम टू द जंगल" प्रदर्शनासाठी सज्ज आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
आणखी वाचा