Jatra Hyalagaad Re Tyalagaad movie : केदार शिंदे हे नाव मराठी चित्रपटसृष्टीत मोठं नाव... त्यांच्या दिग्दर्शन शैलीत विनोद, मनोरंजन आणि भावनिक स्पर्श यांचा उत्तम संगम दिसून येतो. त्यांनी अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. त्यामध्ये जत्रा या चित्रपटाचा खास उल्लेख करावा लागेल. 2006 मध्ये प्रदर्शित झालेला जत्रा प्रेक्षकांच्या मनात आजही ताजा आहे. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, प्रिया बेर्डे अशा अनेक कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटांत होत्या. विशेष या सिनेमातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना भरभरुन हसवतं. या चित्रपटाने प्रेक्षकांची देखील मनं जिंकली. त्यातील "कोंबडी पळाली" हे गाणं तर आजही लग्नसमारंभांपासून ते इव्हेंट्सपर्यंत सर्वत्र गाजताना दिसतं.
याच चित्रपटाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकरने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्रांतीसोबत भरत जाधव, प्रिया बेर्डे, सिद्धार्थ जाधव आणि दिग्दर्शक केदार शिंदे थिरकताना दिसत आहेत. खास बाब म्हणजे त्यांनी "कोंबडी पळाली" या लोकप्रिय गाण्यावर डान्स करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधवची एन्ट्री विशेष आकर्षण ठरली. दरम्यान, त्यामुळे आता "जत्राचा दुसरा भाग येणार का?" अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झालीये.
क्रांतीने या व्हिडीओला "आर लिटील जत्रा रियुनियन. आम्ही चित्रपटातील इतर कलाकारांना मिस केलं, पण खूप धमाल केली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तुम्ही आम्हाला पुन्हा एकत्र पाहायला उत्सुक आहात का?" असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. "आता जत्रा 2 आला पाहिजे", "आवडता चित्रपट आजवर शंभर वेळा पाहिला असेल", "जत्रा 2 साठी खूप उत्सुक आहोत" अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
जत्रा या चित्रपटाने केवळ हशा नाही तर मराठी प्रेक्षकांच्या आयुष्यात एक वेगळा रंग भरला होता. ग्रामीण पार्श्वभूमी, मजेदार पात्रं आणि केदार शिंदे यांची विनोद निर्मितीची शैली यामुळे तो आजवर विसरता आला नाही. त्यामुळेच जत्रा 2 खरोखरच आला, तर मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा हास्याचा महापूर ओसंडून वाहील, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : भर पावसात प्रिया वॉरियरचा तुफान डान्स, मनमोहक अदांनी नेटकऱ्यांची मने जिंकली
डीजेचा धुमाकूळ, कर्णकर्कश्य आवाजात लोकं रममाण, पारंपरिक वादन करता येईना; सौरभ गौखलेने सांगितला अनुभव