गेल्या चार वर्षं घरापासून दूर असलेला भाऊ खरंतर एका चुकीच्या संगतीमुळे कुटुंबाला सोडून गेला आहे. त्याचे आई-वडील आणि त्याची बहीण, सगळे त्याच्या परत येण्यासाठी आतुर आहेत. पण, कितीही प्रयत्न करूनही तो परत येत नाही. अशा परिस्थितीत, एक बहीण तिच्या कुटुंबाचे झालेले हाल पाहते आणि वचन देते की ती कोणत्याही परिस्थितीत तिच्या भावाला परत आणेल.
प्रश्न असा आहे की, एका खलनायकी जोडप्याने पथभ्रष्ट केलेल्या भावाला ती एकटी बहीण योग्य मार्गावर कसे आणणार? तिच्या प्रेम, दृढनिश्चय आणि स्वामी भक्तीच्या जोरावर ती या खडतर प्रवासात यशस्वी होईल का? ही कथा आपल्याला एका तुटलेल्या नात्याला पुन्हा जोडण्याच्या तिच्या प्रवासाची रंजक गोष्ट सांगेल. यात स्वामी तिला नाते पुन्हा जोडण्यासाठी कसा मोलाचा सल्ला देणार? कशी तिला दिशा दाखवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
स्वामी स्थानात गोपाळबुवा स्वामींची पाद्यपूजा करत असताना 'योग्य संगतीचा परिणाम' या विषयावर मार्गदर्शन मागतात. आणि यानंतर घडणाऱ्या घटनांची मालिकाच प्रेक्षकांना थक्क करणारी ठरते. स्वामींच्या आज्ञेनं गोपाळबुवा एका विंचवाला प्रश्न विचारतात आणि त्यानंतर घडतं एक अद्भुत चमत्कार... विंचू आणि नंतर चिमणीसोबत घडणाऱ्या दोन रहस्यमय प्रसंगांतून स्वामी 'संगती'चा खरा अर्थ उलगडून दाखवतात चांगल्या संगतीतून होणारे पुण्य आणि चुकीच्या संगतीतून होणारा अधःपात हे दोन्ही अनुभवातून स्पष्ट करतात.
दरम्यान, शारदाच्या कुटुंबातही भावनिक घडामोडी घडत आहेत. नरेशच्या वागण्यातले बदल, त्याचं खोटं बोलणं आणि त्यामागचं गूढ हे सर्व हळूहळू शारदा आणि विद्याधर यांच्या नजरेस पडतं. शारदा भावासाठी सर्वस्व पणाला लावते, पण तिलाही न समजणाऱ्या एका संकटाची चाहूल लागते. दुसरीकडे, स्वामी अर्थपूर्ण संदेश देताना म्हणतात "पेल्यातलं वादळ वेळीच ओळखावं, नाहीतर त्याचं नियंत्रण कठीण होतं." या वाक्यानं आगामी घटनांवर गूढ छाया निर्माण होते. स्वामींच्या शिकवणीतून भक्तांना मिळणारा आत्मबोध, एका बहिणीचा भावासाठीचा संघर्ष आणि चुकीच्या संगतीमुळे निर्माण झालेलं नात्यातले वादळ या सगळ्याचा संगम प्रेक्षकांना या आठवड्यातील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. कित्येक कुटुंबांना आपलीशी वाटणारी ही गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.