Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) लोकप्रिय मालिका 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) मध्ये येत्या रविवारी एक तासाच्या विशेष भागात स्वामी चरित्रातील प्रचलित "तीन अक्षतांची दैवी लीला' प्रेक्षकांना अनुभवता येईल. हा अत्यंत महत्त्वाचा क्षण एका अत्यंत नाट्यमय कथानकाद्वारे उलगडणारा आहे. आगामी महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना स्वामींच्या अगाध लीलेचा एक असा चमत्कार पाहायला मिळणार आहे, जो केवळ भाऊसाहेब आणि अक्कांचे आयुष्यच बदलणार नाही, तर अहंकारी अंगदच्या ज्योतिषालाही आव्हान देईल. जगण्याचे नवे भान आणि श्रद्धेची नवी शक्ती प्रेक्षकांसमोर मांडेल.
"तुझ्या सगळ्या ग्रहताऱ्यांना तांदळाचे हे तीन दाणे पुरून उरतील!" हे स्वामींचं अंगद या ज्योतिषाला आव्हान आणि ते पूर्ण कसं होतं? हे पाहणं अत्यंत उत्कंठावर्धक आणि रंजक आहे, भक्ताची तळमळ आणि स्वामींची कृपा यांचा हा अद्भुत संगम प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
कथानकाचा मुख्य गाभा स्वामींची भाऊसाहेबांच्या घरी होणारी पाद्यपूजा आणि त्यात येणारी विघ्ने यांच्याभोवती विणलेला आहे. अंगद आणि उमा यांनी रचलेल्या कुटिल डावामुळे पूजेसाठी साधे दूधही उपलब्ध नसते, पण स्वामी तिथेही आपल्या दिव्यत्वाचा प्रत्यय देतात. देव्हाऱ्यातील पितळेच्या गाईला पान्हा फुटतो आणि स्वामींच्या स्पर्शानं दुधाची भांडी भरून वाहू लागतात. स्वामी केवळ विघ्न दूर करत नाहीत, तर अक्कांच्या आजारपणावरही मायेची फुंकर घालतात. जेव्हा ज्योतिषी अंगद भाऊसाहेबांच्या पत्रिकेचा दाखला देत त्यांना कधीही संतती सुख मिळणार नाही असा दावा करतो, तेव्हा स्वामींच्या कपाळावरील गंधातून तीन अक्षता खाली पडतात. या अक्षता केवळ तांदळाचे दाणे नसून पुढे घडणाऱ्या अलौकिक स्वामी लीलेचे संकेत आहेत.
स्वामींच्या या प्रसादरूपी तीन अक्षतांमुळे भाऊसाहेबांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते, दुष्ट माणसे अनेक संकटे त्यांच्या समोर उभी करतात. मात्र, स्वामींच्या आशीर्वादाने भाऊसाहेब या संकटांतून कसे सावरतात आणि त्या तीन अक्षतांचे रहस्य त्यांच्या आयुष्यात कसा बदल घडवते, हे पाहणं येणाऱ्या भागांमध्ये रंजक ठरेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
