Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: कलर्स मराठी (Colours Marathi) आपल्या प्रेक्षकांसाठी आणत आहे, एक अध्यात्मिक आणि भावनिक प्रवास 'श्री क्षेत्र अक्कलकोट महात्म्य' अर्थात 'आदेश स्वामींचा योग अक्कलकोट दर्शनाचा'. अक्कलकोट म्हणजे प्रज्ञापुरी, श्री स्वामी समर्थांच्या दिव्य वास्तव्यानं पावन झालेली भूमी. सुमारे 22 वर्ष स्वामी समर्थांनी इथे वास्तव्य केलं आणि त्यांच्या अनंत चमत्कारांनी हे स्थान आजही भक्तांसाठी मोक्षभूमी ठरलंय. भक्तांच्या श्रद्धेनुसार मानलं जातं की, अक्कलकोटला जाणं म्हणजे, एक प्रकारे चारधाम यात्रा पूर्ण करणं, पण स्वामींचा बुलावा, स्वामींचा आदेश मिळाल्याशिवाय अक्कलकोट यात्रा पूर्ण होणं शक्य नाही. कलर्स मराठी दोन प्रभावी कथा सादर करतंय, ज्यात श्रद्धा, समर्पण आणि स्वामी कृपेचं अद्भुत दर्शन घडणार आहे. 

Continues below advertisement

या नव्या अध्यायाची भव्य सुरुवात येत्या रविवारी 26 ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता प्रसारित होणाऱ्या एक तासाच्या महाएपिसोडनं  होणार आहे. पहिली कथा आहे, एका बाप आणि त्याच्या मुलीची भावनिक कहाणी. अक्कलकोटपासून दोनशे मैलावर राहणारा एक स्वामीभक्त, वयस्क आणि आजारी अवस्थेत स्वामींच्या दर्शनासाठी आसुसलेला आहे, पण त्याच्या शारीरिक व आर्थिक परिस्थितीमुळे तो प्रवास करू शकत नाही. त्याची मुलगी वडिलांच्या इच्छेची पूर्तता करण्याचा संकल्प करते आणि सुरू होतो तिचा अक्कलकोटकडे प्रवास. दुसरी कथा एका श्रीमंत सावकाराच्या अहंकार आणि टोकाच्या भक्तीच्या संघर्षाची आहे. त्याचा  विश्वास आहे की पैशाच्या बळावर तो सर्व काही साध्य करू शकतो, भक्तीची परमोच्च स्थिती गाठू शकतो, देवाची यात्रा सहज थाटामाटात करू शकतो; तर त्याचा सेवक हा साधा पण श्रद्धाळू स्वामीभक्त आहे.

दोघंही एकाच वेळी अक्कलकोट यात्रेसाठी निघतात, पण दोघांचे मार्ग वेगळे आहेत. दोघांचेही मार्ग बिकटच असतात. अशा परिस्थितीत अद्भुत स्वामी लीला घडते. ती नेमकी काय आहे हे उलगडताना या दोन्ही कथा प्रेक्षकांना भक्तीचा नवा अर्थ सांगतील इतर दत्तावतारांपेक्षा स्वामी भक्तीचे वेगळेपण काय आहे हे सविस्तर समजावतील.

Continues below advertisement

मालिकेदरम्यान प्रेक्षकांना अक्कलकोटमधील आजवर न पाहिलेल्या स्थानांची झलक दिसणार आहे, तसेच स्वामी समर्थांनी या भूमीची निवड का केली? याचं उत्तरही या कथानकातून मिळणार आहे.