Jai Jai Swami Samarth: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत सुरू झालाय एक “नवा अध्याय - प्रारब्धाचा शिल्पकार ब्रह्मांडनायक!” भक्तांचे तारणहार स्वामी समर्थ जेव्हा भक्तांच्या मदतीला धावून येतात, तेव्हा असंख्य अद्भुत लीला घडतात. जेव्हा जीवनाचा मार्ग अंधकारमय वाटू लागतो आणि संकटांचे वादळ भोवती घोंगावू लागते, तेव्हा केवळ स्वामींचे ते सगुण रूपच भक्ताला सुखाची सावली देते.
याच दिव्य प्रचितीवर आणि गुरुदेवांवर असणाऱ्या अढळ विश्वासावर आधारित हा नवा भाग प्रेक्षकांसाठी भावनिक आणि आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरणार आहे. भक्तांसाठी त्यांच्या प्रारब्धाची दिशा बदलणारा - स्वामींचा नवा अध्याय - ‘ब्रह्मांडनायक’ याची सुरुवात या आठवड्यापासून झालेली आहे. खास स्वामी भक्तांसाठी ही मालिका आता पुन्हा दररोज रात्री 8 वाजता आपल्या कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नव्या अध्यायाची सुरुवात (Jai Jai Swami Samarth Brahmandnayak Chapter)
या नव्या अध्यायाच्या कथानकात एका हळव्या आणि उत्कंठावर्धक संघर्षाची सुरुवात होत आहे. अक्कलकोटमध्ये राहणारी स्वामीभक्त गौरी एका असाध्य आजाराशी झुंज देत आहे. वैद्यांनुसार तिच्याकडे फक्त येत्या पौर्णिमेपर्यंतचाच काळ असतो. डोळे मिटण्यापूर्वी आपल्या मुलीचे, यमुनेचे लग्न व्हावे आणि स्वामींच्या आशीर्वादाने मिळालेले राहते घर यमुनेच्या सुरक्षित हातात जावे, ही तिची शेवटची इच्छा आहे. गौरी स्वामींसमोर एकाच इच्छेची पूर्ती मागते – “मला मरण्याआधी माझ्या मुलीचं लग्न पाहायचंय.” गौरीची स्वामींप्रती असलेली भक्ती, श्रद्धा आणि स्वामींवरचा विश्वास पाहून स्वामी तिला वचन देतात की, “तुला तुझ्या मुलीचं लग्न पाहायला नक्कीच मिळणार, मी शब्द देतो.”
मात्र, गौरीच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी काही दुष्ट प्रवृत्ती तिच्या घरावर नजर ठेवून असतात. तसेच यमुनाला फसवण्यासाठी एक जाळे विणतात. तिथला क्रूर सरदार मोक्याच्या जागेवर असलेल्या गौरीच्या घरावर डल्ला ठेवून असतो. त्याला ते घर त्याच्या ताब्यात घ्यायचे असते. त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, त्याचा दरारा मोठा आहे. मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असल्याने गौरी घाईघाईत स्वामींच्या गूढ संकेतांकडे दुर्लक्ष करते, तर दुसरीकडे यमुनाचे सूत एका प्रामाणिक तरुणाशी जुळत असते. या गुंतागुंतीच्या प्रवासात भक्ताची फसवणूक टाळण्यासाठी, त्यांचे दुष्ट लोकांपासून रक्षण आणि त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वामी पाठीशी राहून नेमकी काय लीला घडवणार, हे पाहणं रंजक ठरेल.
थोडक्यात सांगायचे तर, "गुरुने दिलेला शब्द गुरु पाळतो म्हणजे पाळतोच!" या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवणारा हा एक कौटुंबिक आणि आध्यात्मिक थरार असेल. एकीकडे काळ वेगाने सरकत असताना गौरीची प्रकृती खालावत जाणार असते आणि दुसरीकडे वाईट प्रवृत्तींच्या व्यक्तींचे डावपेच तीव्र होणार असतात. वाईट शक्तींचा नाश करून ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे रक्षण कसे करतात, तसेच त्यांच्या जीवनाला कशी नवी दिशा देतात, हे अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी दररोज रात्री 8 वाजता या नव्या अध्यायाचा आनंद घ्यावा.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
