Indrayani Marathi Serial Track: आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पााचं थाटात आगमन झालं आहे. 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच आता दिग्रसकरांच्या वाड्यातही लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. दिग्रसकरांचा यंदाचा गणेशोत्सव खास ठरणार आहे. 

लग्नानंतरचा पहिला गणपती, त्यात पहिल्यांदाच गौरीचं आगमन इंद्रायणीसाठी हा उत्सव भावनिक आणि खास दोन्ही आहे. शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगून झटणाऱ्या इंद्रायणीने घरात बाप्पा आणि गौराईचं स्वागत करताना 'ज्ञान आणि भक्तीचा संगम' या थीमची निवड केली आहे. वारकरी पेहरावातील गणराय, सजावटीत दिसणारी शाळा आणि शिक्षणाची प्रतीकं हे सगळं एकत्र येऊन संदेश देतं, 'ज्ञानाची उपासना हीच खरी भक्ती.' गणरायासोबत मोठ्या थाटात गौराईचं आगमन देखील होणार आहे.   

वाड्यात साजरा होणारा हा जल्लोष अविस्मरणीय ठरणार आहे. पारंपरिक खेळ, त्याची मजा, आणि कलर्स मराठीवरील लोकप्रिय नायिकांनी त्यांच्या खास आवाजात आणि ठसक्यात सादर केलेली गाणी, तेजाचे अनोखे पारंपरिक गाण्याचे fusion, गंमतीशीर खेळ, या सर्वामुळे या भागाची रंगत दुपटीनं वाढणार आहे. इंद्रायणीच्या सख्यांचा जल्लोष अनोखा, गणरायासंगे दुमदुमणार जागर गौराईचा. 

इंद्रायणी 1000 मोदकांचं आव्हान पार पाडणार?

भैरवी, तेजा, वल्लरी आणि प्रेरणा या सख्या दिग्रसकर वाड्यात पोहचून घरातल्या तणावाला एकदम रंगतदार वळण देणार आहेत. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचा वाड्यातला स्वॅग एंट्री प्रेक्षकांना भारावून टाकेल. एकमेकींच्या खांद्याला खांदा लावून त्या इंद्रायणीच्या मेहनतीत, तिच्या स्वप्नात, तिच्या विश्वासात त्या सहभागी होताना दिसणार आहेत. 'तू एकटी नाहीस हा संदेश देणारा त्यांचा हा उत्साहवर्धक क्षण प्रेक्षकांच्या मनात घर करून जाईल. 1000 मोदकांचा नैवेद्य एकटीने हे पार पाडणं इंद्रायणीसाठी मोठं आव्हान आहे. त्यात घरातील काही जण विशेषत: आनंदीबाई या उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. इंद्रायणीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न देखील होणार आहेत, पण बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तिला मिळालेल्या  इंद्रायणी तिच्या मैत्रिणींच्या मदतीने 1000 मोदकांचं आव्हान कसं पार पाडणार? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

या खास भागात कलर्स मराठीवरील नायिका सहभागी होऊन इंद्रायणीसोबत गणराय-गौराईचा उत्सव साजरा करणार आहेत. नृत्य, गाणं, खेळ, पारंपरिक विधी हे सगळं पाहणाऱ्यांसाठी डोळ्याचं पारणं फेडणारं ठरेल. गणरायाच्या मंगलमूर्तीबरोबर पहिल्यांदाच घरात येणारी गौराई, इंद्रायणीची जिद्द, तिच्या सख्यांची साथ, आणि आनंदीबाईंच्या कारस्थानांना मिळालेलं उत्तर या सर्वांचा संगम अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.