Indian Idol Winner Pavandeep on Accident: इंडियन आयडॉल 12 चा विजेता आणि लोकप्रिय गायक पवनदीप (Pavandeep Rajan) पुन्हा चर्चेत आलाय. गेल्या वर्षी एका भीषण अपघातातून बचावल्यानंतर पवनदीपने त्याच्यासोबत घडलेल्या भीषण अपघाताबद्दल खुलासा केला आहे. 2025 मध्ये झालेल्या या गंभीर अपघातात त्याच्या दोन्ही पायांना आणि हातांना मोठी दुखापत झाली होती. झोपेत असतानाच हा अपघात झाल्यामुळे त्याला काहीही करता आलं नाही. अपघातानंतर पवनदीप अक्षरशः अंथरुणाला खिळला होता. मात्र, प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारांमुळे तो या कठीण काळातून बाहेर पडू शकला, असं त्यानं सांगितलं. (Indian Idol 12 Winner)
पवनदीप राजन आज संगीत क्षेत्रातील एक ओळखले जाणारे नाव आहे. ‘इंडियन आयडल’ जिंकण्यापूर्वीही तो उत्तराखंडच्या संगीतविश्वात प्रसिद्ध होता. या शोमुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच 2025 मध्ये त्याच्यावर मोठं संकट आलं.
अपघाताच्या रात्री नेमकं काय घडलं?
गायक आणि संगीतकार सलीम मर्चंट यांच्या पॉडकास्टमध्ये पवनदीपने त्या अपघाताची सविस्तर माहिती दिली. तो म्हणाला, “एका शोसाठी ऑफर आली होती. आम्ही दिवसा निघणार होतो, पण मी संध्याकाळी निघायचं ठरवलं, जेणेकरून सकाळपर्यंत पोहोचू. पहाटे 3 वाजताच्या सुमारास आमची गाडी एका उभ्या ट्रकला जाऊन धडकली. मी त्या वेळी झोपलेलो होतो, त्यामुळे नेमकं काय झालं हे कळलंच नाही. उठल्यावर पाहिलं तर माझे दोन्ही पाय आणि एक हात फ्रॅक्चर झाले होते. ड्रायव्हरला झोप लागली होती आणि त्याने गाडी ट्रकमध्ये घातली.”
पवनदीपने सांगितलं की, अपघातानंतर तो गाडीचं दारही उघडू शकत नव्हता. त्याचा एकच हात काम करत होता. त्याने बाहेर काढण्यासाठी मदत मागितली. दरम्यान, गाडीला आग लागली होती, मात्र त्याआधीच त्याला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
देवाच्या कृपेनंच वाचले प्राण
या अपघातानंतर पवनदीप महिनाभर हलूही शकत नव्हता. आता तो पूर्णपणे बरा झाला असून, चालण्याचं महत्त्व त्याला नव्याने जाणवलं आहे. कठीण प्रसंगात न खचता सकारात्मक राहण्याचा सल्ला देत तो म्हणाला, दुःखाच्या काळातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अलीकडेच त्याने ‘इंडियन आयडल 16’मध्येही हा अनुभव पुन्हा सांगितला होता. त्याची ही जिद्द ऐकून विशाल ददलानी यांनी त्याचं कौतुक केलेलं, तर करिश्मा कपूरही भावूक झालेली. सध्या पवनदीप कॉन्सर्ट्स आणि म्युझिक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून त्याची गाणी चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत.
