Bafta Awards Bung: फिल्म इंडस्ट्रीतील मानाचा समजला जाणारा बाफ्टा पुरस्कार सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. लंडनमध्ये 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या ‘ब्रिटीश अकादमी फिल्म अवॉर्ड्स 2026’ मध्ये एका भारतीय चित्रपटाने विशेष लक्ष वेधून घेतले. हा चित्रपट बॉलिवूडचा नसून मणिपुरी फिल्म इंडस्ट्रीतील ‘बूंग’ (Boong) आहे. या यशाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे.

‘बूंग’ने रचला इतिहास

यंदाच्या बाफ्टा पुरस्कारांमध्ये भारताने महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली. ‘बूंग’ या मणिपुरी चित्रपटाने बेस्ट चिल्ड्रन अँड फॅमिली फिल्म या विभागात पुरस्कार पटकावत इतिहास घडवला. या श्रेणीत बाफ्टा जिंकणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. या यशामुळे देशभरातून चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पंतप्रधान मोदींची खास प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले. “या चित्रपटाशी संबंधित सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. विशेषतः मणिपूरसाठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. तसेच, आपल्या देशात दडलेल्या अफाट सर्जनशील प्रतिभेचेही हे सुंदर उदाहरण आहे.” अशा शब्दांत त्यांनी टीमचे कौतुक केले.

या चित्रपटाच्या लेखिका व दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांचा हा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न असून त्यांच्या कामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. लंडनमधील Royal Festival Hall येथे पार पडलेल्या सोहळ्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

काय आहे ‘बूंग’ची कथा?

‘बूंग’ हा चित्रपट मणिपूरमधील एका सत्य घटनेवर प्रेरित आहे. कौटुंबिक आणि भावनिक धाग्यांनी विणलेली ही कथा ‘बूंग’ नावाच्या छोट्या मुलाभोवती फिरते. या भूमिकेत बालकलाकार गुगुन किपगेन दिसतो. वडील हरवल्यानंतर बूंग आणि त्याची आई त्यांचा शोध घेण्यासाठी निघतात या प्रवासातून उलगडणारी भावनिक कहाणी प्रेक्षकांना भिडते.

चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर, विकेश भूटानी, एलन मॅकएलेक्स, रितेश सिधवानी आणि शूजात सौदागर यांनी केली आहे. यापूर्वी 2024 मध्ये या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन टोरंटो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या डिस्कव्हरी विभागात झाले होते.‘बूंग’च्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे मणिपुरी चित्रपटसृष्टीकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधले गेले आहे.