India's Got Latent Row: 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) मध्ये युट्युबर रणवीर अलाहबादियानं (Ranveer Alahabadiya) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागानं (Maharashtra Cyber ​​Cell) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी युट्यूबर समय रैनाला (Samay Raina) पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे. युट्युबर समय रैना परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे घ्यावी, अशी मागणी त्यानं केली होती. पण ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागानं फेटाळूना लावली आहे. तसेच, समय रैनाला पुन्हा एकदा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितलं असल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली आहे. महाराष्ट्र सायबर सेलनं 19 मार्चपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास समय रैनाला सांगितलं आहे. 


'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागानं समय रैना, रणवीर अलाहाबादियासह 30 ते 40 जणांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरच्या उपस्थितीत झालेल्या 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या 1 ते 6 भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांच्या सहभागाची पडताळणी सुरू आहे. 


समय रैनाला 19 मार्च रोजी जबाब नोंदवण्यासाठी बोलावणं 


महाराष्ट्र सायबर सेलनं समय रैनाला नवं समन्स पाठवलं आणि त्यांना 19र्च रोजी जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. यापूर्वी, सायबर सेलनं समय रैनाला 18 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचं समन्स पाठवलं होतं, परंतु समय रैना त्यांच्यासमोर हजर झाला नाही, त्यानंतर समय रैनाला आणखी एक समन्स पाठवण्यात आलं आहे.


'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर इलाहाबादियाच्या अश्लील कमेंटनंतर, समय रैनाने शोचे सर्व एपिसोड युट्यूबवरून काढून टाकले होते. सर्वोच्च न्यायालयानं पॉडकास्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत YouTube किंवा इतर प्लॅटफॉर्मवर कोणतेही कार्यक्रम प्रसारित करण्यास मनाई केली आहे.


आशिष चंचलानी, रणवीर इलाहाबादिया याचीही चौकशी 


दरम्यान, रणवीर अलाहाबादियानं सोशल मीडियावर दोनदा माफी मागितली आहे. अपशब्द वापरल्यामुळे अडचणीत आलेला युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया 7 मार्च रोजी गुवाहाटी येथे आसाम पोलिसांसमोर हजर झाला. गेल्या आठवड्यात, गुवाहाटी गुन्हे शाखेनं 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणासंदर्भात आणखी एक युट्यूबर आशिष चंचलानी यांची चौकशी केली होती. युट्यूबर क्राईम ब्रांचच्या कार्यालयात पोहोचला, जिथे त्याची बराच वेळ चौकशी करण्यात आली.


गुवाहाटीचे सहपोलीस आयुक्त अंकुर जैन यांनी माध्यमांना सांगितलं होतं की, "युट्यूबर आशिष चंचलानी चौकशीसाठी गुन्हे शाखेत आले होते. त्यांनी तपासात सहकार्य केलं आहे. गरज पडल्यास आम्ही त्यांना फोन करू, सध्या आम्ही त्यांना पुन्हा फोन करत नाही आहोत. तपासात सहभागी असलेल्या इतर लोकांकडून आम्हाला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. लवकरच त्यांना नव्यानं समन्स पाठवले जातील."


सर्वोच्च न्यायालयाकडून रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर अटी-शर्थी 


सर्वोच्च न्यायालयानं रणवीर अलाहाबादिया यांना त्यांचा पॉडकास्ट पुन्हा सुरू करण्याची परवानगी अटी-शर्थी लागू करून दिली आहे. तसेच, रणवीर 'शालीनता आणि नैतिकतेचे मानक' राखतील, अशीही तंबी न्यायालयानं रणवीर अलाहाबादियाला दिली आहे. न्यायालयानं स्पष्ट केलं की, अलाहाबादियाच्या शोनं न्यायालयात प्रलंबित असलेल्या कार्यवाहीवर भाष्य करू नये. यापूर्वी 18 फेब्रुवारी रोजी न्यायालयानं अलाहाबादियाच्या अटकेला स्थगिती दिली होती, या अटीवर की तपास अधिकाऱ्यांनी बोलावल्यावर ते तपासात सामील होतील.