Husband Tortured His Wife For Figure Like Nora Fatehi: आपली बायको सुंदर दिसावी, सर्वांत उठून दिसावी, अशी प्रत्येक नवऱ्याची इच्छा असते. त्यासाठी काही नवरे खूप प्रयत्न करतात. बायकोसाठी डाएट प्लान करणं, किंवा तिला शॉपिंग करुन देणं आणि इतर काही पर्याय बायकोला उपलब्ध करुन देतात. पण, आपली बायको बॉलिवूड सेलिब्रिटीसारखी (Bollywood Celebrity) दिसावी म्हणून बायकोला 3-3 तास जिममध्ये एक्सरसाईज करायला लावणाऱ्या नवऱ्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. एवढंच नाहीतर कर्वी फिगर व्हावी म्हणून हा पठ्ठ्या बायकोला उपाशीसुद्धा ठेवायचा. धक्कादायक बाब म्हणजे, या काळात नवऱ्यानं बायकोला गर्भपात करायलाही भाग पाडलेलं. सुरुवातीला नवऱ्याचा त्रास बायकोनं सहन केला, पण त्रास असह्य झाल्यानंतर अखेर वैतागलेल्या बायकोनं पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरादनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं पोलिसांना सांगितलं की, तिचा नवरा तिला दररोज टोमणे मारतो आणि म्हणतो की, तिची फिगर अभिनेत्री नोरा फतेहीसारखी (Nora Fatehi) असायला हवी. यासाठी पती तिला दररोज तीन-तीन तास जिममध्ये व्यायाम करायला भाग पाडतो.
पीडित महिलेचा नवरा फिजिकल एजुकेशन टीचर आहे. महिलेचा आरोप आहे की, तिची उंची आणि सौंदर्य सामान्य आहे, पण तिचा नवरा तिच्या शरीरयष्टीचा इतका द्वेष करत होता की, तो तिला दररोज टोमणे मारायचा आणि म्हणायचा की, त्यानं चुकीच्या व्यक्तीशी लग्न केलंय.
उत्तर प्रदेश गाजियाबादमधील मुरादनगर इथं राहणाऱ्या तरुणीचं याच वर्षी मार्च महिन्यात मेरठ इथं राहणाऱ्या एका शिक्षकासोबत झालेलं. लग्नामध्ये पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी 24 लाखांची महिंद्रा स्कार्पिओ कार, रोख रक्कम आणि दागिने दिले होते. या लग्नात पीडितेच्या वडिलांना 75 लाख रुपये खर्च आला होता. लग्नात इतका खर्च करून सुद्धा शिक्षक नवऱ्यानं पीडितेला त्रास दिला.
महिलेनं तक्रार करताना काय सांगितलं?
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे की, लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्यानं तिच्यासोबत एका खोलीत झोपायला नकार दिला. त्यादिवशी काहीतरी कारण सांगून तो आई-वडिलांच्या खोलीत जाऊन झोपला. लग्नानंतर तो तिच्याशी अजिबात नीट वागायचा नाही. पीडितेची उंची फार नाही, दिसायलाही सुंदर नाही, असं म्हणत नवरा सारखं तिच्या शरीरावर कमेंट करायचा आणि तिचा सतत राग करायचा. नवरा सतत टोमणे मारायचा... रागवायचा, त्रास द्यायचा. त्याचे आई वडिल आणखी पैशांची मागणी करत होते. पीडितेशी लग्न करून माझं नशीब फुटलं, मी थांबलो असतो तर नोरा फतेही सारखी सुंदर बायको मिळाली असती, असं नवऱ्याचं म्हणणं होतं. त्यामुळे तो पीडितेला रोज जिममध्ये पाठवायचा. तिथे 3-3 तास व्यायाम करायला लावायचा आणि नोरा फतेही सारखी फिगर बनवण्यासाठी दबाव टाकायचा. फिगर चांगली व्हावी म्हणून पीडितेला जेवण सुद्धा देत नव्हता. काही दिवसांपूर्वी पीडितेचा नवरा एका मुलीशी चॅट करत होता, त्याबद्दल विचारलं असता त्यानं थेट मारहाण करायला सुरुवात केली.
पीडितेनं सासरच्यांवरही आरोप केले आहेत. पीडितेचं म्हणणं आहे की, तिचे सासु-सासरे तिला आणि तिच्या पतीला एकत्र कुठेच जाऊ द्यायचे नाही. घरातल्या कामांवरुन तिची सासू तिला विनाकारण त्रास द्यायची. एकदा रात्री तिचा नवरा आला आणि खोलीत मच्छरदाणी सापडली नाही तेव्हा तो रागावला आणि तिच्या पतीने तिला मारहाण केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :