Hridaynath Mangeshkar: आपल्या गायनातून भारतीयांची मनं जिंकणाऱ्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीतविश्व पोरकं झाला आहे.  (Asha Bhosle Passed Away) 12 एप्रिल रोजी 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाजींच्या निधनाने एका युगाचा अंत झाला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. काल ( 13 एप्रिल ) रोजी मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार, कुटुंबीय, खेळाडू , तसे जर राजकीय मान्यवरांनी आशा ताईंना शेवटची मानवंदना दिली. आशाजींना अखेरचा निरोप देताना साऱ्यांनाच अश्रू दाटून आले होते. आशा भोसले यांच्या बहिण उषा मंगेशकर यांनीही बहिणीला अखेरचा निरोप दिला. पण हृदयनाथ मंगेशकर यांना आपल्या 'लाडक्या आशाला' अखेरचा निरोप देता आला नाही. आशाताईंच्या अंत्यसंस्कारानंतर काहीच वेळात हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी या मागचं कारण सांगत एक मोठी घोषणा केली.

काय म्हणाले हृदयनाथ मंगेशकर ?

आशा भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका भव्य रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. अशी घोषणा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधनानंतर केली. ते म्हणाले," माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मला मुंबईला अंत्यसंस्कारासाठी जाता आलं नाही याचं दुःख आहे. " ते पुढे म्हणाले," आपली सगळी दुःख विसरून आधी कर्तव्य करायचं असतं असं आम्हाला दीदीने शिकवलं. त्यामुळे ही सगळी दुःख विसरून मी आधी हे काम केलं. " 

ते म्हणाले," माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला दीदीने म्हणजेच लता मंगेशकर यांनी त्यांच्या नावाने पुण्यात एक मोठ रुग्णालय उभारायचं ठरवलं होतं. नंतर आम्ही मोठ्या मेहनतीने 'दीनानाथ मंगेशकर रुग्णालय' बांधलं. नंतर आम्ही दीदीच्या नावे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. आशाताईंनी या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मी येईन असं म्हटलं होतं. पण हृदयविकाराच्या झटक्याने आता त्या आपल्यात नाहीत. आम्ही त्यानंतर विचार केला दीदीने जसे आपल्या वडिलांसाठी रुग्णालय बांधायचा निर्णय घेतला होता. आम्ही विचारविनिमय करून आशा भोसले यांच्या नावेही रुग्णालय बांधायचा निर्णय घेतोय. रुग्णालयाचे नाव असेल 'लता आशा मंगेशकर रुग्णालय'. या माध्यमातून लतादीदी आणि आशाताई या  दोघींना श्रद्धांजली वाहण्याचा आमचा प्रयत्न आहे. आशियातील हे सर्वात मोठे रुग्णालय असेल असा आम्ही प्रयत्न करतोय. जागा मोठी आहे बघू आता देवाच्या कृपेने होईल " असं हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.

'दीदीच्या आठवणी अनंत आहेत.  फार वाईट परिस्थितीत इथे आलो आहे. आशा दीदीच्या नावाने रुग्णालय व्हावं हे सांगण्याचं कर्तव्य करण्यासाठी एवढ्या दुःखातून इथे आलो आहे." असं ते म्हणाले.