horror blockbuster movie : जर तुम्ही हॉरर चित्रपटांचे चाहते असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. जरी IMDb वर या चित्रपटाला फक्त 6.3 रेटिंग मिळालं असलं, तरीही ही फिल्म इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉरर चित्रपटांपैकी एक ठरली आहे. या चित्रपटात ना कोणतेही मोठे स्टार्स होते, ना भव्य व्हिज्युअल्स; तरीही बॉक्स ऑफिसवर याने जादू निर्माण केली आणि आजही प्रेक्षक या सिनेमाला विसरू शकलेले नाहीत.

आपण बोलत आहोत "पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी" या चित्रपटाबद्दल, जो एका साध्या कॅमेऱ्याने शूट करण्यात आला होता. तरीही या चित्रपटाने लाखो लोकांचा थरकाप उडवून  एक वेगळी ओळख निर्माण केली. हा 2007 मधील एक सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट होता, ज्यामध्ये केटी फेदरस्टन आणि मिका स्लॉट यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती ओरेन पेली यांनी केली होती.

ही ओरेन पेली यांची पहिलीच फिल्म होती, जी त्यांनी स्वतःच्या घरातच शूट केली होती. ना मोठा खर्च, ना सेट, फक्त एक कॅमेरा आणि खरी कल्पकता. त्यांनी दिग्दर्शनापासून एडिटिंगपर्यंत सगळं स्वतः केलं. कलाकार देखील अपरिचित होते. सुरुवातीला या चित्रपटाचा खर्च फक्त सुमारे 12 लाख रुपये होता. मात्र नंतर हा खर्च वाढून 2 कोटी रुपयांपर्यंत गेला.

चित्रपटाचं बजेट वाढण्यामागे कारण होतं – स्टीव्हन स्पीलबर्ग. त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा क्लायमॅक्स आणि काही दृश्य पुन्हा शूट करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे एकूण खर्च 2.15 लाख डॉलर (सुमारे 2 कोटी रुपये) झाला.

या चित्रपटात एका तरुण जोडप्याच्या घरात घडणाऱ्या अज्ञात, अदृश्य भुताटकीच्या घटना दाखवल्या आहेत. दारं आपोआप हलतात, अंधारात पावल्यांचे आवाज, विचित्र शांतता… अशा गोष्टींमुळे चित्रपटात हळूहळू तणाव वाढत जातो. या सगळ्याच गोष्टींमुळे प्रेक्षक खिळून राहतात. रक्तपात, प्रचंड गोंगाट, किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स नसतानाही, एक सामान्य घर आणि सामान्य जीवन यातूनच चित्रपट प्रेक्षकांना घाबरवतो. म्हणूनच लोकांना हा चित्रपट अधिक वास्तवदर्शी आणि रिलेटेबल वाटतो.

चित्रपट एका वेळेस सर्व थिएटरमध्ये रिलीज झाला नव्हता. सुरूवातीला तो केवळ कॉलेज शहरांमध्ये दाखवला गेला. त्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर याबद्दल बोलायला सुरुवात केली. हीच उत्सुकता पाहून निर्मात्यांनी आणि पॅरामाउंट पिक्चर्स ने हळूहळू अधिक थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित केला.

त्यांनी प्रेक्षकांना म्हटलं – "तुमच्या शहरात हा चित्रपट हवा असेल, तर त्याची मागणी करा." ही एक वेगळी आणि प्रभावी मार्केटिंग पद्धत होती. शेवटी चित्रपट 1945 सिनेमाघरांमध्ये रिलीज झाला आणि त्याने जगभरात 193 मिलियन डॉलर्स (सुमारे 1,660 कोटी रुपये) कमावले आणि एक ब्लॉकबस्टर ठरला.

हा चित्रपट हॉरर चित्रपटांच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला. कमी बजेट असूनही अफाट यश मिळवता येतं, हे त्याने सिद्ध केलं. IMDb रेटिंग सरासरी असली तरी, "पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी"ने हॉरर चित्रपटांची व्याख्या बदलून टाकली.

आज ही फिल्म Amazon Prime Video आणि Netflix वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. हॉरर चित्रपटांचे चाहते ती नक्की पाहू शकतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा – ही फिल्म खरोखरच अंगावर शहारे आणणारी आहे आणि तुम्हाला व्यथित करू शकते.

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

वर्णभेदाविरोधात लढणाऱ्या 'मिस पुद्दुचेरी'ने जीवन संपवलं, झोपेच्या गोळ्या खाऊन टोकाचा निर्णय, धक्कादायक कारण समोर!