मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांना हायकोर्टानं तूर्तास दिलासा दिला आहे. महेश भट्ट आणि त्यांचे बंधू मुकेश भट्ट यांच्याबद्दल पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही मानहानिकारक आणि निंदनीय विधान करू नका, असे निर्देश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री लुव्हियाना लोध यांना दिले आहेत. यासंदर्भात भट्ट बंधूंनी हायकोर्टात दाखल केलेल्या दिवाणी याचिकेवर तीन आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे निर्देश लोध यांना देत सोमवारची सुनावणी तहकूब केली.


लुव्हियाना लोधने 23 ऑक्टोबर रोजी दिलेला एक इंटरव्ह्यू इन्स्टाग्रामवर पोस्ट करत महेश आणि मुकेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लुव्हियानाचा नवरा सुमित सभरवाल हा भट्ट यांचा दूरचा पुतण्या आहे. सुमित हा बॉलिवूड वर्तुळातील ड्रग्ज आणि वेश्या व्यवसायात सामील असून तो महेश भट्ट यांच्या सांगण्यावरून हे धंदे करतो त्यामुळे त्यांना या सर्व गोष्टींची माहिती आहे. अशा आशयाचे आरोप या इंटरव्ह्यूमध्ये लुव्हियानाने केले आहेत. तसेच तिने महेश भट्ट यांचा उल्लेख बॉलीवूडमधील 'डॉन' असा करत बॉलिवूडमधील ड्रग्ज साखळी चालविणाऱ्या पैकी भट्ट एक असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. याविरोधात महेश भट्ट यांनी हायकोर्टात धाव घेत मानहानीचा दावा दाखल केली असून झालेल्या अब्रुनुकसानीविरोधात प्रत्येकी 1 कोटी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. महेश भट्टसोबत मुकेश भट्ट यांनीही लुव्हियानानं इन्स्टाग्रामवरील ती वादग्रस्त पोस्ट काढून टाकात बिनशर्त माफी मागण्याची मागणी या याचिकेतून केली आहे. तसेच भविष्यात तिला भट्ट यांच्याबद्दल अशी चुकीची, अवमानकारक, त्रासदायक आणि निंदा करणारी वक्तव्ये करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणीही याचिकेमधून करण्यात आली आहे.


या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्यासमोर तातडीने प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा, भट्ट हे भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्व असून त्यांनी जवळपास पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत आपलं भरीव योगदान दिले आहे. सभरवाल हे महेश भट्ट यांच्या बहिणीच्या दिराचा मुलगा आहे. त्यामुळे भट्ट यांचे त्याच्याशी कोणतेही थेट नाते नाही, असा युक्तिवाद भट्ट यांच्यावतीने बाजू मांडताना अॅड. अमित नाईक यांनी केला. त्यामुळे सदर व्हिडिओ हा दिशाभूल करणारा आहे. त्यामागचे मूळ कारण हे सभरवाल आणि लोध या दोन कुटुंबांमधील जागेवरून झालेला वाद आहे. अशाप्रकारे आक्षेपार्ह व्हिडिओच्या माध्यमातून सभरवाल यांच्यासोबत असलेल्या वादावर लोध यांच्याकडून तोडगा काढण्यासाठीचा हा एक शेवटचा प्रयत्न करण्यात आला असल्याचेही भट्ट यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.


ही बाजू ऐकून हायकोर्टानं भट्ट यांना अंतरिम दिलासा देत पुढील सुनावणीपर्यंत लोध यांनी त्यांच्याबाबत कोणतेही आक्षेपार्ह विधान करू नये, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यावर, भट्ट यांच्याविरोधात कोणतीही अवमानकारक किंवा आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही, असे आश्वासन लोध यांच्या वकिलांकडून कोर्टाला देण्यात आले, त्यावर लोध यांना तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर उत्तर सादर करण्याचे निर्देश देत हायकोर्टानं ही सुनावणी तहकूब केली.