Harry Potter Actor In Hindi Web Series : दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) हे सध्या महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारीत असलेली वेब सीरिज 'गांधी'वर (Gandhi Web Series) काम करत आहेत. या प्रोजेक्टची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये वेब सीरिजबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या मालिकेतील कलाकारांशी संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हंसल मेहताच्या या मालिकेत अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्सही काम करणार आहेत. यामध्ये हॅरी पॉटर चित्रपटातील प्रसिद्ध कलाकाराचा समावेश आहे. या वेब सीरिजमध्ये प्रतीक गांधी (Pratik Gandhi) हा महात्मा गांधी यांची भूमिका साकारत आहे.
हॅरी पॉटर चित्रपटातील अभिनेता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार
हॅरी पॉटर या गाजलेल्या हॉलिवूडपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता टॉम फेल्टन हा हसंल मेहता यांच्या गांधी या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. टॉमने हॅरी पॉटरमध्ये ड्रॅको मालफॉय ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता टॉम फेल्टन प्रतीक गांधीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
हंसल मेहताची वेब सीरिज हा टॉम फेल्टनचा पहिला भारतीय प्रोजेक्ट आहे. टॉम फेल्टन व्यतिरिक्त या मालिकेत लिबी मे, मॉली राइट, राल्फ एडेनी, जेम्स मरे, लिंडन अलेक्झांडर, जोनो डेव्हिस, सायमन लेनन हे कलाकार देखील दिसणार आहेत.
प्रतीक गांधी गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या वेब सीरिजमध्ये प्रतीक गांधीची पत्नीही दिसणार आहे. प्रतिक गांधी यांची पत्नी भामिनी ओजा या मालिकेत कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. रिअल लाईफमधील कपल पहिल्यांदाच पडद्यावर पती-पत्नीची भूमिका साकारणार आहेत.
हॅरी पॉटर स्टार टॉम फेल्टन हा वेब सीरिजमध्ये जोशिया ओल्डफिल्डची भूमिका साकारणार आहे. जोशिया ओल्डफिल्ड हे महात्मा गांधींचे लंडनमधील शिक्षणादरम्यानचे पहिले आणि चांगले मित्र होते.
हंसल मेहता हे बॉलीवूडमधील नावाजलेल्या चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्यांपैकी एक आहेत. शाहिद आणि छलांग यांसारख्या चित्रपटांसाठी हसंल मेहता ओळखले जातात. महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित त्यांच्या बहुप्रतिक्षित बायोपिकची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेपूर्वी हंसल मेहता आणि प्रतीक गांधी यांनी 'स्कॅम 1992' मध्ये एकत्र काम केले होते. या वेब सीरिजला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता.