Hardik Joshi emotional interview about sister in law: मराठी मालिकाविश्वात 'तुझ्यात जीव रंगला' ही सिरियल प्रचंड गाजली. या मालिकेतील मुख्य पात्र राणा दा अर्थात हार्दिक जोशीनं आपल्या सोज्वळ आणि निखळ अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. कलाकार होण्यापर्यंतच्या प्रवासात हार्दिकला त्याच्या कुटुंबाची विशेष साथ लाभली. या सगळ्या प्रवासात एका व्यक्तीची मुख्य साथ लाभली. ती व्यक्ती म्हणजे हार्दिक जोशीची वहिनी. हार्दिकच्या भावाची पत्नी त्याच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभी राहिली आहे. पण, 2023 साली हार्दिकच्या वहिनीचं निधन झालं. हार्दिकनं नुकतंच दिलेल्या मुलाखतीत वहिनीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
हार्दिकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वहिनीसोबतच्या नात्याबाबत खुलासा केला. 'माझ्या कलाकार होण्यापर्यंतच्या प्रवासात वहिनीची मला साथ लाभली. तिनं मला खंबीर पाठिंबा दिला. सुरुवातीला मी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत होतो. तेव्हा मला भाऊ आणि वहिनीने मिळून एक बुलेट घेतली होती. रोज प्रवास करण्यासाठी त्यांनी मला गिफ्ट दिली होती. दादा तेव्हा रिक्षाने जात होता. मला नोकरी करायची नव्हती. 'तुला नोकरी करायची नाही ना? मग नको करुस तू नोकरी.. वहिनीचं पहिल्यापासून ठाम मत होतं. आमच्या परिसरात तिला राणाची वहिनी म्हणून ओळखू लागले होते. तेव्हा तिला खूप आनंद व्हायचा".
"आमच्याच वहिनी दिराचं नसून, भावा बहिणीचं नातं होतं. पण आमच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. वहिनीचं निधन झालं. मी खूप खचलो. मला या काळात अक्षयाने खूप सपोर्ट दिला. या काळात तिला अनेक प्रोजेक्ट्ससाठी ऑफर्स आले होते. पण तिनं आपलं काम थांबवलं. तेव्हा मी काम करत होतो. पण घरात कुणीतरी लक्ष देणं गरजेचं होतं. अक्षयाने तेव्हा साधारण 12-13 मालिका सोडल्या असावेत. मी घराकडे लक्ष देते, असं तिनं स्वत: सांगितलं होतं".
हार्दिकची वहिनीची तब्येत बिघडली, त्यादिवसाची आठवण काढत हार्दिक म्हणाला, "मला जाऊबाई गावात हा शो मिळाला. या शोचं प्रोमो शूट झाला होता. मला त्याच दिवशी डॉक्टरांचा फोन आला होता. वहिनीला कधीही काही पण होऊ शकतं, असं मला त्यांनी सांगितलं. मी त्वरीत झीच्या ऑफिसला फोन लावून हा मला शो जमणार नाही, असं सांगितलं. झीची टीम पुण्यात आली होती. त्यांनी मला आधार दिला. तेव्हा माझ्या वहिनीला समजलं मी हा शो सोडतो आहे. वहिनी ऑक्सिजनवर होत्या. अॅडमिट असतानाही मला त्यांनी झापलं. 'हा शो सोडला तर बघ, माझी शप्पथ आहे तुला...' असं वहिनी म्हणाली. जेव्हा या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड ऑन एअर गेला. तेव्हा माझ्या वहिनीचं निधन झालं. वहिनीचं अंत्यसंस्कार केल्यानंतर मी थेट शूटसाठी गेलो. कलकारांचं आयुष्य वेगळं असतं. ते कुटुंबाबरोबर सुखात नसतात, दु:खादही नसतात. कारण, शो मस्ट गो ऑन".
