Hanuman Ansh Box Office Day 27: 'हनुमान अंश' (Hanuman Ansh) हा 2026 मधील सर्वाधिक प्रॉफिटेबल फिल्म ठरली आहे. केवळ 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुरळा उडवला आहे. रिलीज होऊन 27 दिवस लोटले तरीसुद्धा या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची तुफानी घौडदौड सुरूच आहे. या सिनेमानं अवघ्या 27 दिवसांत 60 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
विशेष म्हणजे, सोमवारच्या तुलनेत मंगळवार आणि बुधवारी सिनेमाच्या कमाईत वाढ दिसून आलीय. बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी (26 वा दिवस) 8.50 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, बुधवारी (27 वा दिवस) या सिनेमानं 7,037 शोमधून 7.25 कोटी रुपयांची कमाई केली. यासह, सिनेमानं भारतात 61.38 कोटी रुपयांची नेट कलेक्शन आणि 72.32 कोटी रुपयांची ग्रॉस कलेक्शन केलं आहे.
'हनुमान अंश' किती कमावले? (Hanuman Ansh Box Office Collection)
'हनुमान अंश'ची बॉक्स ऑफिसवर सुरुवात 2 कोटी रुपयांच्या बजेटसमोर 10 लाख रुपयांच्या कमाईनं झाली होती. सुरुवातीच्या काळात 'आवारापन 2' (Awarapan 2) आणि 'बटवारा' (Batwara) यांसारख्या सिनेमांच्या स्पर्धेमुळे त्यांच्या कमाईत घट झाली होती. मात्र, सतराव्या दिवशी परिस्थितीत बदल झाला आणि सिनेमाच्या कमाईचा आलेख उंचावू लागला. सध्या हा चित्रपट दररोज सातत्याने 6 कोटी ते 9 कोटी रुपयांची कमाई करत आहे. दरम्यान, मंगळवारी कमाईत वाढ झाल्याचंही दिसून आलं.
'हनुमान अंश' सिनेमातल्या गाण्यानं जिंकली मनं (Hanuman Ansh Net Collection)
कोणत्याही मोठ्या गाजावाजाशिवाय प्रदर्शित झालेल्या 'हनुमान अंश' सिनेमातील 'मोरे संकट के कटैया' (More Sankat Ke Kataiya) हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बुंदेलखंडचे लोकगायक सुनील लोधी यांनी हे गाणं गायलं असून, या गाण्यामुळे त्यांचा आवाज अशा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय, जे यापूर्वी त्यांना अजिबातच ओळखत नव्हते.
'हनुमान अंश'ची बॉक्स ऑफिसवरील कमाई (Hanuman Ansh, Neem Karoli Baba)
साऊथचा सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाची सगळीकडे चर्चा रंगलेली असतानाच 'हनुमान अंश' सिनेमानं अगदीच दबक्या पावलांनी बॉक्स ऑफिसवर एन्ट्री घेतली. पण, कुणाला माहीत होतं, बलाढ्य अशा बजेटमध्ये बनलेल्या यशच्या 'टॉक्सिक'समोर अगदीच तुटपुंज्या बजेटमध्ये बनलेला 'हनुमान अंश' सिनेमा एवढा हिट ठरेल. या सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवशी सुमारे 10 लाख रुपयांची कमाई केली होती आणि पहिल्या दोन आठवड्यांत एकूण 1.48 कोटी रुपये कमावले होते. मात्र, तिसऱ्या आठवड्यात लोकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादांमुळे सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली. या काळात सिनेमानं 10.40 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर 22 व्या दिवशी 6.25 कोटी, 23 व्या दिवशी 9.25 कोटी आणि 24 व्या दिवशी 12.75 कोटी रुपयांची दमदार कमाई झाली. 25 व्या दिवशी, म्हणजेच चौथ्या सोमवारी, सिनेमानं 5.15 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
