Hanuman Ansh Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर कधी काय घडेल याचे अंदाज असले तरी काही सिनेमे अंदाजांचे ठोकताळे मोडून काढतात आणि इतिहास रचतात. चार आठवड्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या हनुमान अंश या सिनेमाने असं काही करून दाखवलं आहे, जे सिनेमाच्या इतिहासात दीर्घकाळ लक्षात ठेवलं जाईल. ज्या सिनेमासाठी सुरुवातीचे तीन आठवडे थिएटरमध्ये प्रेक्षक फिरकत नव्हते, त्याच सिनेमाची रिलीजच्या चौथ्या आठवड्यात तिकीटं मिळणं कठीण झालं आहे. ‘हनुमान अंश’ने (Hanuman Ansh) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) एवढी कशी कमी केली? की फ्लॉप म्हणता म्हणता हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरतोय? पाहूया.
‘हनुमान अंश’ने कसा रचला इतिहास?
‘हनुमान अंश’ मोठ्या पडद्यावर 31 जुलै 2026 रोजी प्रदर्शित झाला. सुरुवातीला या सिनेमाला मोजक्याच स्क्रीन्स मिळाल्या. दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांच्या या सिनेमाला पहिल्या दोन आठवड्यांत फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, सिनेमाचा खरा खेळ तिसऱ्या आठवड्यापासून सुरू झाला. ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिस कमाई लाखांमधून थेट कोटींच्या घरात पोहोचली. विशेष म्हणजे, साधारणपणे रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सिनेमांच्या कमाईत घट पाहायला मिळते. मात्र, ‘हनुमान अंश’च्या बाबतीत याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळालं. दुसऱ्या आठवड्यानंतर सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली.
नफ्याच्या बाबतीतही ‘हनुमान अंश’ अव्वल
‘हनुमान अंश’चं बजेट अवघं 2 कोटी रुपये आहे. तर सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर तब्बल 46 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच या सिनेमाने आपल्या बजेटच्या तब्बल 23 पट अधिक कमाई केली आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केलेली ही कमाई निश्चितच लक्षवेधी ठरली आहे. या सिनेमाचं भारतामधील एकूण ग्रॉस कलेक्शन ₹58.70 कोटींवर पोहोचलं आहे. लोक अक्षरशः गळ्यात भगवे स्कार्फ घालून चित्रपटगृहांमध्ये जात आहेत. चपला काढून सिनेमा पाहत आहेत. सोशल मिडीयावर या बाबतीत अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
कशावर आधारित आहे ‘हनुमान अंश’ची कथा?
‘हनुमान अंश’ची कथा नीब करोरी बाबा यांच्या जीवनावर आधारित आहे. सप्टेंबर 1973 मध्ये त्यांचं निधन झालं होतं. उत्तराखंडमधील नैनीताल येथे आजही त्यांच्या नावाने आश्रम आहे. स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती नीब करोरी बाबा यांचे अनुयायी असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या विचारांनी आणि शिकवणीने प्रेरित झालेल्या या व्यक्तींमुळेही त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. कोणत्याही मोठ्या स्टारकास्ट किंवा गाजावाजाशिवाय प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान अंश’ने सोशल मीडियाच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर घेतलेली झेप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
