Gullak Season 5 Trailer: स्वयंपाकघरात अजूनही स्टीलचे डबे रचलेले आहेत. दुपारच्या शांतवेळी कूलरचा तोच परिचित आवाज ऐकू येतो. पप्पा अजूनही विजेच्या बिलावर बारकाईनं लक्ष ठेवतात. आणि चहाच्या गप्पा, अपूर्ण वाद आणि जेवणाच्या टेबलवरील खुसखुशीत टोमण्यांमध्ये मिश्रा कुटुंब पुन्हा एकदा प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे.
भारताचे सर्वात लाडके मध्यमवर्गीय कुटुंब 5 जूनपासून 'गुल्लक 5' (Gullak Season 5) च्या माध्यमातून सोनी लिव्हवर परतत आहे. प्रेक्षकांनी वर्षानुवर्षे जपलेली ऊब, गोंधळ, विनोद आणि भावनिक क्षण पुन्हा अनुभवायला मिळणार आहेत. सतत बदलणाऱ्या कंटेंटच्या जगात गुल्लक ही पहिली हिंदी ओरिजिनल मालिका ठरली आहे जी पाचव्या सीझनपर्यंत पोहोचली असूनही सर्व पिढ्यांतील प्रेक्षकांच्या मनाशी घट्ट नातं जोडून ठेवते.
यावेळी मिश्रा निवासाला फक्त नवा रंगरंगोटीचा स्पर्श नाही, तर आयुष्याचाही नवा टप्पा लाभणार आहे. घराला नवा रंग, नवीन वाय-फाय कनेक्शन आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारे कुटुंब, हे सगळं यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र बाहेरचं जग कितीही बदललं तरी घरातील छोट्या-छोट्या क्षणांची ऊब कायम तशीच राहते.
अनंत जोशी साकारणारा अन्नू यावेळी स्वतःला सिद्ध करण्याच्या दबावाशी झुंजताना दिसणार आहे, जिथे महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वासाचा संघर्ष सुरू आहे. अमन यावेळी अधिक शांतपणे परततो, पण त्याच्याकडेही काही गुपितं आहेत. दुसरीकडे, "बिट्टू की मम्मी" या नावानं ऑनलाइन लोकप्रियता मिळाल्यामुळे शांती अचानक चर्चेत येते आणि त्या प्रसिद्धीचा आनंद घेताना दिसते. या सगळ्या बदलांमध्ये गुल्लक एक साधा पण मनाला भिडणारा प्रश्न विचारते, आपण खरंच आपल्या मुळांपासून दूर जाऊ शकतो का?
नव्या सीझनबद्दल बोलताना TVF चे अध्यक्ष विजय कोशी म्हणाले, "प्रत्येक सीझनसोबत गुल्लक प्रेक्षकांच्या आणखी जवळ जात गेली कारण मिश्रा कुटुंब हे प्रत्येकाला ओळखीचं वाटतं. पाचवा सीझन मध्यमवर्गीय भारताच्या बदलत्या वास्तवाचं प्रतिबिंब दाखवतो, पण त्याचवेळी मालिकेची ऊब आणि साधेपणा कायम ठेवतो. हा सीझन बदल, प्रगती आणि पुढे जात असतानाही आपल्या मुळांशी जोडून राहण्याच्या भावनेबद्दल आहे."
गीतांजली कुलकर्णी म्हणाल्या, "शांती ही नेहमीच मिश्रा कुटुंबाची भावनिक ताकद राहिली आहे, पण यावेळी प्रेक्षकांना तिची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल, बदलत्या जगाशी स्वतःच्या पद्धतीने जुळवून घेणारी. गुल्लक ची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती रोजच्या आयुष्याचं अतिशय प्रामाणिक चित्रण करते आणि म्हणूनच लोकांना या व्यक्तिरेखांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतं..."
द वायरल फीव्हर निर्मित या नव्या सीझनमध्ये जमील खान, गीतांजली कुलकर्णी, हर्ष मायर, सुनीता राजवार, हेली शाह आणि अन्नूच्या भूमिकेत यावेळी अनंत जोशी अशी लोकप्रिय कलाकारांची फळी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
हास्य, घरगुती नोकझोक किंवा डोळे पाणावणारे भावनिक क्षण, कोणत्याही कारणासाठी प्रेक्षक गुल्लक 5 पाहायला बसले तरी ही मालिका पुन्हा एकदा घरच्यासारखीच वाटणार आहे. 'गुल्लक 5' 5 जूनपासून फक्त सोनी लिव्हवर स्ट्रीम होणार आहे.
ट्रेलर पाहिलात?
महत्त्वाच्या इतर बातम्या :
