Gullak 5 Sony Liv Web Series: लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ चालणाऱ्या ओटीटी सीरिजपैकी (OTT Series) एक असलेल्या 'गुल्लक'चे (Gullak) दरवाजे पाचव्या सीझनसाठी उघडत आहेत. 'गुल्लक' या OTT शोचा पाचवा सीझन लवकरच SonyLIV वर प्रदर्शित होणार आहे. या नवीन सीझनमध्ये एका विशेष पात्राचा समावेश असणार आहे. या नवीन सीझनमध्ये मिश्रा कुटुंबात एक परिचित पात्र पण नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. अभिनेता अनंत व्ही. जोशी 'गुल्लक'च्या पाचव्या सीझनमध्ये (Gullak Fifth Season) आनंद 'अन्नू मिश्रा'च्या भूमिकेत दिसणार आहे.
'गुल्लक' हा शो त्याच्या साधेपणासाठी, कौटुंबिक जिव्हाळ्यासाठी आणि दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या प्रसंगांच्या वास्तववादी चित्रणासाठी प्रसिद्ध आहे. या सीझनमध्ये, मिश्रा कुटुंबाच्या घराचे दरवाजे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होत आहेत. जुन्या पात्रांसोबतच, एक नवीन चेहराही या शोमध्ये सामील होत आहे. अन्नू भैय्याच्या व्यक्तिमत्त्वातील तोच जुना मोहकपणा, निरागसता आणि भावनिक खोली अनंत व्ही. जोशी पुढे घेऊन जाताना दिसणार आहे.
या लोकप्रिय सिरीजमध्ये सामील झाल्याबद्दल बोलताना अनंत वी. जोशी म्हणाला की, "गुल्लक' सिरीज नेहमीच माझ्या मनाच्या जवळ राहिली आहे, कारण मिश्रा कुटुंब मला आपल्या स्वतःच्या कुटुंबाची आठवण करून देतं. त्यांचं प्रेम, छोटे क्षण, संवाद आणि साधेपणा लोकांच्या मनाला स्पर्श करतो. मी बऱ्याच काळापासून या मालिकेचा चाहता राहिलो आहे, त्यामुळे आता त्याचा एक भाग होणं ही माझ्यासाठी खरोखरंच खास बाब आहे. अन्नू भैय्याच्या प्रवासात सामील होणं हा एक रोमांचक अनुभव होता, विशेषतः कारण या सीझनमध्ये त्याच्या आयुष्याची अधिक प्रगल्भ आणि विकसित बाजू पाहायला मिळणार आहे. सेटवर पहिल्या दिवसापासून संपूर्ण कलाकार आणि टीमकडून मिळालेल्या प्रेमामुळे हा अनुभव अधिक संस्मरणीय झाला. मी 'गुल्लक' कुटुंबाचा भाग झाल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रेक्षक या नवीन सीझनचा कसा आनंद घेतात, हे पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे..."
द व्हायरल फिव्हर निर्मित या नवीन सीझनमध्ये जमील खान, गीतांजली कुलकर्णी, हर्ष मयार आणि सुनीता राजवार हे कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, तर या सीझनमध्ये अनंत जोशी अन्नूची भूमिका साकारणार आहे. 'गुल्लक 5' लवकरच सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
