Government decision : आता विकेंडला सिनेमा पाहाण्यासाठी तुम्ही जात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पण हा निर्णय महाराष्ट्रासाठी लागू होणार नाही, तर कर्नाटक सरकारने याबाबतचा निर्णय घेतलाय. कर्नाटक सरकारने चित्रपटाच्या तिकिटांची किंमत ठरवली आहे. आता तुम्हाला 500 किंवा 700 रुपये नाही, तर फक्त 200 रुपयांत कोणत्याही चित्रपटाचे तिकीट मिळेल. एवढीच रक्कम भरून तुम्ही तुमचा आवडता चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकता. याबाबतचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय.
कर्नाटक सरकारने शुक्रवारी कर्नाटक सिनेमा (नियंत्रण) नियम, 2014 मध्ये दुरुस्ती करत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या तिकिटाची जास्तीत जास्त किंमत 200 रुपये निश्चित केली गेली आहे. यात मल्टिप्लेक्सचाही समावेश आहे. या रकमेत कोणत्याही प्रकारचा कर (टॅक्स) समाविष्ट नाही.
फक्त एक अट पाळावी लागेल
सरकारने दिलेल्या या सुविधेत एकच अट ठेवली आहे. 75 किंवा त्याहून कमी जागा असलेल्या, प्रीमियम सुविधांनी सज्ज मल्टी-स्क्रीन चित्रपटगृहांना 200 रुपयांपेक्षा जास्त किंमत आकारण्याची मुभा आहे. मात्र, जर तुम्ही अशा प्रकारच्या थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेला नाही, तर तुम्हाला एका तिकिटासाठी फक्त 200 रुपयेच मोजावे लागतील.
जुलैमध्ये तयार झाला होता मसुदा
जुलै महिन्यात राज्य सरकारने कर्नाटक सिनेमा (नियंत्रण) अधिनियम, 1964 (कर्नाटक अधिनियम क्रमांक 23 of 1964) मधील कलम 19 अंतर्गत कर्नाटक सिनेमा (नियंत्रण) नियम, 2014 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी मसुदा तयार केला होता. सरकारने या मसुद्यावर हितधारकांकडून 15 दिवसांच्या आत सूचना/प्रतिक्रिया मागवल्या होत्या.
आक्षेप- सूचनांचा आढावा घेत नियम जाहीर
हितधारकांकडून आलेल्या आक्षेप आणि सूचनांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर कर्नाटक सरकारने हे नियम अंतिम केले आहेत. अधिसूचनेनुसार, कर्नाटक सिनेमा (नियमन) (दुरुस्ती) नियम, 2025 राजपत्रात अंतिम प्रकाशनाच्या तारखेपासून लागू होतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या