Golden Globe Awards 2023: गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या आर आर फिल्मचं अभिनंदन करताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केलेले ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. मुख्यमंत्री जगन मोहन यांच्या ट्वीट मध्ये तेलुगू झेंडा डौलात फडकतो आहे, असे शब्द होते. त्यावरून गायक अदनान सामी याने यात तेलुगू अस्मिता का? आपण आधी भारतीय आहोत, अशी टिप्पणी केली आहे. ही विघटनवादी मानसिकताच देशाला घातक असल्याची टिप्पणी अदनानने केली. यावरून सोशल मीडियामध्ये मात्र दोन गट पडले आहेत. काहींनी अदनानच्या भावनेचं समर्थन केलं, तर काहींनी जगन मोहन यांच्या शब्दांमध्ये काही वावगं नसल्याचंही म्हटलं.
इतके दिवस बॉलीवूड दाक्षिणात्य फिल्मला कमी लेखत होतं, आता जेव्हा दाक्षिणात्य चित्रपट आपल्या जोरावर आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवतायेत तेव्हा हे क्रेडिट घेण्यासाठी सर्वांना राष्ट्रीय अस्मितेची आठवण होते का, असाही सवाल काही युजर्सनी विचारला आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जन्मलेले अदनान सामी यांनी 2016 मध्ये भारताचे नागरिकत्व स्वीकारले आहे.
दरम्यान, एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' हा चित्रपट मार्च 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये ज्युनियर एनटीआरने कोमाराम भीमची भूमिका केली होती आणि राम चरणने अल्लुरी सीताराम राजूची भूमिका केली होती. याशिवाय अजय देवगण आणि आलिया भट्टसारखे स्टार्सही या चित्रपटात दिसले. RRR ने देशातच नाही तर परदेशातही धमाल केली आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. एसएस राजामौली यांनी यापूर्वी बाहुबली आणि बाहुबली 2 सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे.