G. D. Madgulkar House Controversy: गीत रामायणाची रचना करणारे कवी ग .दि. माडगूळकर (Gadima House) यांच्या पंचवटी निवासस्थानावरून सध्या वाद निर्माण झालाय. पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेलं गदिमांचं पंचवटी निवासस्थान जमीनदोस्त करण्यासाठी त्यांच्याच नातेवाईकांकडून ग. दि. माडगूळकर यांचे नातू सुमित्र माडगूळकर यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी याबाबत आवाज उठवलाय. जवळच्या नातेवाईकांना ही वास्तू पाडून बिल्डरच्या घशात घालायची आहे आणि त्यात पैसे उकळायचे आहेत, असा आरोप करत, हे होऊ देणार नसल्याचं सुमित्र माडगुळकर यांनी म्हटलंय.
ज्या वास्तुत गदिमांनी गीत रामायण लिहिले, अनेक रचना रचल्या त्या साहित्यिक कलाकृतींची साक्ष देणारी ती पवित्र वास्तू आहे. गदिमांचे खोटे नाव घेऊन वारसा सांगणाऱ्या लबाड लांडग्यांनी म्हणजेच पडद्यामागे कारवाया करणाऱ्या नातेवाईकांनी हिम्मत असेल तर गदिमांच्या पंचवटीला हात लावून दाखवा. तुम्हाला माझे चॅलेंज आहे, असे म्हणत गदिमांच्या नातवाने पंचवटी पाडण्यासाठी दबाव टाकणाऱ्यांना इशारा दिलाय.
पंचवटी संदर्भात सुमित्र माडगूळकर यांची पोस्ट
या फेसबुक पोस्टमध्ये सुमित्र माद्कुलकर यांनी लिहिलं,"गदिमांची पवित्र वास्तू "पंचवटी" पाडण्यास विरोध करीत आल्यामुळे मी व माझ्या कुटुंबाच्या (मी,माझी बायको व छोटी मुलगी) जीवाला धोका व माझी खोटी बदनामी करण्याचे कुभांड. गदिमांनी हयात असताना असे म्हंटले होते की जोपर्यंत माझे घर पंचवटी आहे तो पर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील.गदिमांची पवित्र वास्तू पंचवटी पाडावी/ बिल्डरला विकावी असा दबाव आमच्या घरातील अगदी जवळच्या नातेवाईकांकडून (अगदी ते लोक ज्यांनी पंचवटीवर, गदिमांवर मोठी मोठी पुस्तके लिहिली आहेत ते या कटात सामील आहेत,केवळ लोकांना दाखवायला ते गदिमांचा वारसा सांगतात पण प्रत्यक्षात त्यांचे पंचवटी पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत).माझ्यावर गेले काही महिने याच्यावरून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याला मी माझ्या जीवात जीव असे पर्यंत विरोध करतो आहे विरोध करणार आहे.गदिमांची वास्तू मी पाडू अथवा विकू देणार नाही.केवळ पैशांसाठी हे लोक गदिमांची पवित्र वास्तू पाडत आहेत. असा आरोप त्यांनी केला.
