Sanjay Leela Bhansali News:  भारतीय सिनेसृष्टीतील प्रभावशाली आणि दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना काल रात्री ह्रदयविकाराचा झटका आला, अशी माहिती समाजमाध्यमांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. कालच म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवशीच त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी देखील माहिती पसरली. दरम्यान, या बातमीवर संजय लीला भन्साळीच्या टीमने आणि कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे. भन्साळींच्या कुटुंबाने या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. 

संजय लीला भन्साळींच्या कुटुंबाने, हे वृत्त फेटाळून लावले आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या कुटुंबाने म्हटलं की, 'संजय लीला भन्साळी पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांनी नुकताच एक नियमित वैद्यकीय तपासणी केली असून, काळजी करण्याची काहीही कारणे नाहीत. सर्वांचे प्रेम, काळजी आणि शुभेच्छा आमच्यासोबत आहेत.  तुमचा पाठिंबा आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद'.

 

 

संजय लीला भन्साळी हे भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. त्यांनी आतापर्यंत सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.   ते भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर  नेण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत आपल्या कारकि‍र्दीत क्लासिक चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे.  ते सध्या लव्ह अँड वॉर या प्रॉजेक्टमध्ये व्यस्त आहेत. या भव्य ऐतिहासिक चित्रपटात दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला  मिळणार आहे. या बिग बजेट चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

संजय लीला भन्साळी यांनी खामोशी : द म्युझिकल या चित्रपटातून  आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात केली. या चित्रपटाला पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.   देवदास असो किंवा, पद्मावत, त्यांनी आपल्या सेटसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन, प्रेक्षकांसाठी कायम भव्य चित्रपट साकारले आहे.  हिरामंडीच्या सेटसाठी त्यांनी 200 कोटी खर्च केले होते. हा सर्वात महागडा सेट मानला जात आहे.