Director Ram Gopal varma: रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. साधारण 11 दिवसांत या चित्रपटाने वर्ल्डवाइड 1361.95 कोटींचे कलेक्शन केले. या चित्रपटाला प्रेक्षकवर्गासह कलाकारांकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. तर, काहींनी या चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलं. तर, काही जण या चित्रपटाच्या विरोधात बोलत आहे. फिल्ममेकर राम गोपाल वर्माने धुरंधरच्या दुसऱ्या सिक्वेलचं कौतुक केलं. तसेच धुरंधरविषयी बोलताना राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधला. तसेच लांबलचक पोस्ट लिहून टीका केली. सध्या फिल्ममेकरने एक्सवर शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
राम गोपाल वर्माने आपल्या एक्स हँडलवर दिग्दर्शक आदित्य धर आणि धुरंधर 2 या चित्रपटाच्या निगडीत एक पोस्ट शेअर केली आहे. फिल्ममेकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'आदित्य धरने फिल्म इंडस्ट्रीत मोठा धमाका केलाय. यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत अक्षरश: शांतता पसरली आहे. फिल्म इंडस्ट्रीत झालेल्या धमाक्यानंतर चित्रपटसृष्टीतील इतर जण आऊटर स्पेसला गेले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडात त्यांना ऐकू येत नाहीये. किंवा ते एकमेकांसोबत कुजबूज करत असतील, की ही तर एक प्रोपोगेंडा फिल्म आहे. ज्याची लाट लवकर ओसरुन जाईल. जेणेकरुन ते पुन्हा त्यांचे जुने - पुराने चित्रपट तयार करण्यास सुरुवात करतील'.
'किंवा हे लोक चित्रपटाच्या निव्वळ उत्कृष्टतेने इतके भारावून गेले आहेत, की या लोकांना आता जाणवलं आहे की, ती जे काही बनवण्याची योजना आखत होते, ती गोष्ट आता तोलामोलाची राहिलेली नाही. ते या चित्रपटाची बरोबरी करुच शकत नाही. पण धुरंधरसारख्या डायनासोरकडे दुर्लक्ष करणं मुर्खपणाचं नाही का?', असं रामगोपाल वर्मा म्हणाले. 'जे आपल्या डोळ्यांसमोर उभं आहे. तुमच्या पायाखालची जमीन हादरवत आहे. याकडे दुर्लक्ष करणारा व्यक्ती किती मूर्ख असू शकतो?', असंही राम गोपाल वर्मा म्हणाले.
'माझ्या सर्व मित्र आणि सहकलाकारांना एकच सल्ला देऊ इच्छित आहे, धुरंधर चित्रपटाला गांभीर्याने घ्या. चित्रपटनिर्मितीचा फ्रेश कोर्सप्रमाणे सखोल अभ्यास करा. असं केलं नाही तर तुम्ही आऊटडेटेड व्हाल. अन्यथा इंडस्ट्रीतील तुमचं भवितव्य धोक्यात येऊ शकते. आधी प्रदर्शित झालेले चित्रपट स्मशानभूमीत कायमचे गाडले जाण्याची शक्यता आहे', असं राम गोपाल वर्मा म्हणाले.
