मुंबई : कलाकाराला चांगल्या भूमिकेची वाट बघावी लागते. ती भूमिका जोवर आपल्या वाट्याला येत नाही तोवर कलाकार अस्वस्थ असतो. मिळेल ते काम करण्याकडे त्याचा कल असतो. पण एकदा कलाकार म्हणून तो नावारुपाला आला की त्याच्याकडे चांगल्या भूमिका येऊ लागतात. हिंदीत असे अनेक नायक आहेत. आता कंगनाच्या रुपाने त्यात नायिकाही दाखल झाली आहे. कंगना रनोटची कामगिरी पाहता आणि ती राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मारत असलेली मजल पाहता अनेक निर्माते तिच्याकडे रांग लावून बसले आहेत. त्यातूनच चांगल्या भूमिका तिच्याकडे येऊ लागल्या आहेत.
कंगनाने फारच उत्तम सिनेमे दिले आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो क्वीन, तनु वेड्स मनू या सिनेमांचा. तिच्या मणिकर्णिका या सिनेमाचीही चर्चा झाली. आता आणखी दोन मोठे बायोपिक तिच्याकडे आहेत. पैकी एक आहे थलैवी. हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनपट म्हणून ओळखला जातो. हा चित्रपट पूर्ण झाला असून तामीळमध्ये या चित्रपटाला यू सर्टिफिकेट मिळालं आहे. तर दुसरा चित्रपट आहे धाकड. अर्थात हा बायोपिक नाही. पण हा एक्शनपट असल्याचं कळतं. हा चित्रपट सुरू असतानाच कंगनाकडे आता आणखी एक मोठा बायोपिक आला आहे या चित्रपटाचं नाव आहे इमर्जन्सी.
इमर्जन्सी हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर बेतला आहे. यात इंदिरा गांधी यांची भूमिका कंगना साकारणार आहे. आज इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो पोस्ट करून या भूमिकेची तयारी सुरू झाल्याची माहीती तिच्या चाहत्यांना दिली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एकूण तीन फोटो शेअर केले आहेत. यात कंगनाच्या चेहऱ्याचं मोजमाप घेतलं जात आहे. शिवाय, तिचा हातही स्कॅन होताना दिसतो आहे. इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत शिरण्यासाठी या काही गोष्टी आवश्यक असल्याचं कंगना म्हणते. इन्स्टाग्रामवर हे काही फोटो पोस्ट करताना तिने खाली लिहिलं आहे, की प्रत्येक व्यक्तिरेखा साकारणं ही एक सुखद सुरूवात असते. इमर्जन्सी या चित्रपटात इंदिराजी यांची भूमिका साकारण्यासाठी चेहरा आणि शरीर असं स्कॅन केलं जात आहे. त्यांच्यासारखं दिसण्याची ही तयारी आहे. अनेक मोठे कलाकार हे एक व्हिजन ध्येयापर्यंत नेण्यासाठी काम करतायत.
विशेष बाब अशी की इमर्जन्सी हा चित्रपट मणिकर्णिका फिल्म्स करणार आहे. त्यासाठीची आवश्यक तयारीही चालू आहे. सध्या या सिनेमाची पूर्व तयारी सुरू आहे. कंगना सध्या धाकडचं चित्रिकरण संपवण्याच्या तयारीतही आहे. ते शूट झाल्यानंतर कंगना पुढच्या इमर्जन्सी चित्रपटासाठी जोर लावणार आहे. या चित्रपटााचं चित्रिकरण नेमकं कधी सुरू होणार आहे, हा चित्रपट कधी संपणार आहे ते मात्र इतक्याच कळलेलं नाही. पण पुढच्या वर्षी रिलीज होणारे जे मोठे चित्रपट आहेत, त्यापैकी इमर्जन्सी हा एक चित्रपट असल्याचं मानलं जातं.