Dr. L. Subramaniam’s Journey with the Violin: प्रख्यात व्हायोलिन वादक आणि संगीतकार डॉ. एल. सुब्रमण्यम यांचे भारतीय संगीत क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. त्यांना 2025मध्ये प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. भारतीय शास्त्रीय संगीतामधील एखाद्या वाद्याची जागतिक प्रतिमा ज्या थोडक्या कलाकारांनी बदलली, त्यामध्ये डॉ. एल. सुब्रमण्यम यांचे नाव पहिल्या फळीत येते. व्हायोलिनवादक, संगीतकार आणि अभ्यासू विद्वान म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे संगीत क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. त्यांनी गेली अनेक दशके भारतीय व्हायोलिनला पारंपरिक चौकटींच्या पलीकडे नेले. सिम्फनी हॉल्स, जॅझ महोत्सव आणि पाच खंडांतील आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व्यासपीठांवर त्यांनी भारतीय संगीताचा ठसा उमटवला.
डॉ. एल. सुब्रमण्यम यांनी खडतर प्रवासातून भारतीय संगीत क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान, अनेक मुलाखतीतून त्यांनी आपल्या विलक्षण प्रवासाविषयी माहिती दिली. या कारकिर्दीत घडणाऱ्या चढ उतारात त्यांना त्यांच्या वडिलांची भक्कम साथ लाभली. आपल्या प्रवासाविषयी बोलताना डॉ. सुब्रमण्यम नेहमीच एका व्यक्तीचा कायम उल्लेख करतात, ती व्यक्ती म्हणजे त्यांचे वडील आणि गुरु लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम. "चेहरा माझा असू शकतो, पण मी आज जे काही आहे, तंत्र, दृष्टी आणि आत्मविश्वास.. ते सगळं त्यांचंच म्हणजेच माझ्या वडिलांचं आहे", असं त्यांनी म्हटलंय.
डॉ. एल सुब्रमण्यम यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सुरूवातीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या आयुष्यातील पहिले संगीत सादरीकरण भारतात झाले नव्हते. तर, हा शो श्रीलंकेत पार पडला होता, असं त्यांनी सांगितलं. जाफना येथील प्रसिद्ध नल्लुर कंदस्वामी मंदिरात हा शो पार पडला होता. वयाच्या 6 व्या वर्षी त्यांनी संगीत सादर केलं. तेव्हा ते खूप घाबरलेले होते. त्यांचा संगीत शो नेमका कसा पार पडला, जाणून घेऊयात.
"आजोकांना माझं सादरीकरण नको होतं. हजारो लोक उपस्थित असलेला तो एक मोठा महोत्सव होता. त्यांना वाटलं होतं की सहा वर्षांचा मुलगा सगळा कार्यक्रम बिघडवून टाकेल. पण मी तेव्हा सादरीकरण केलं. मला आयोजकांची भीती वाटत होती आणि अपयशाचीही भीती वाटत होती. घरी परतल्यावर काय होईल याचीही भीती वाटत होती. मी नेमकं काय वाजवलं, हे मला आजही आठवत नाही", असं त्यांनी सांगितलं.
"हा क्षण माझ्या स्मरणात कोरला गेला. सादरीकरण झाल्यानंतर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आवाज ऐकू आला. त्यानंतर मंदिरातील अधिकाऱ्यांनी, देवाने स्वतः त्या मुलाच्या माध्यमातून वादन केलंय, असं म्हणाले. अशा पद्धतीने माझ्या आयुष्यात एक चांगली सुरूवात झाली. यामुळे माझ्या जीवनाला नवा सूर मिळाला", जुन्या आठवणींना उजाळा देत डॉ. एल सुब्रमण्यम यांनी ही मुलाखतीतून माहिती दिली.