Dr. Anand Nadkarni Passes Away: मानवी मनाची गुंतागुंत, सूक्ष्म बारकावे आणि मानसिक आजार (Mental Illness) याबाबत सामान्यांना समजेल अशा सहजसोप्या शैलीत लिखाण करणारे आणि याच गोष्टीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी (Dr. Anand Nadkarni) यांचे शुक्रवारी मुंबईत (Mumbai News) निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. आनंद नाडकर्णी यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शुक्रवारी सकाळी मुंबईतील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आजार आणि मानसोपचार विपुल लेखन केले आहे. मानसिक आजाराचा फार मोठा बाऊ न करता ही मानवी जीवनातील शारिरीक आजारासारखीच सामान्य बाब आहे, याबाबत त्यांनी अनेकांना जागरुक केले. एकूण मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. डॉ.  आनंद नाडकर्णी यांची 'कर्ता शेतकरी' ही मालिका ABP माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर  चांगलीच गाजली होती.

डॉ. आनंद नाडकर्णी (Dr. Anand Nadkarni Death) यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. नाडकर्णी यांनी 'रंग माझा वेगळा' आणि 'असेच आम्ही सारे' ही व्यावसायिक नाटकं लिहिलीत. त्यांच्या 'मयसभा' या नाटकाला लेखन पुरस्कार मिळालेला. 'मिफ्ता'च्या नाट्य विभागासाठी आनंद नाडकर्णी यांची कथासंकल्पना असलेल्या 'गेट वेल सून' या नाटकाची त्यावर्षीच्या 10 सर्वोत्कृष्ट नाटकांत निवड करण्यात आली होती.

मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध 'चळवळ'

डॉ. आनंद नाडकर्णी म्हणजे, बुहआयामी व्यक्तीमत्व. ते एक मराठी लेखक, नाटककार आणि ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी 1980 साली एम.बी.बी.एस आणि 1984 साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदव्या मिळवल्या. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध 'चळवळ' उभारण्यासाठी एक संस्था स्थापन करायची कल्पना डॉ. नाडकर्णी यांच्या मनात मनोविकारशास्त्राचं शिक्षण घेताना आली, आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवलीही. त्यानुसार, 23 मार्च 1990 रोजी ठाणे शहरात आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची औपचारिक स्थापना झाली. तीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढ्यापुरतंच ठाण्यातील या संस्थेचे काम मर्यादित नाही. उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्याचे कुटुंबीय, दैनंदिन जीवनातील प्रश्नांमुळे गांजलेली व्यक्ती, कोणतीही समस्या नाही परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्व-विकासासाठी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, अशा सर्वांसाठी ही संस्था काम करते. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा कल्प्कतेनं वापर केला जातो.

डॉ. आनंद नाडकर्णी यांची गाजलेली नाटकं आणि पुस्तकं 

  • असेच आम्ही सारे (नाटक)
  • आम्ही जगतो बेफाम (नाटक)
  • आरोग्याचा अर्थ
  • एका सायकिॲट्रिस्टची डायरी
  • कर्मधर्मसंयोग : मर्म सात्त्विक जीवनविकासाचे
  • किंचित
  • गद्धेपंचविशी
  • गेट वेल सून (नाटक, कथा संकल्पना आनंड नाडकर्णींची; नाट्यलेखन प्रशांत दळवी यांचे)
  • जन्मरहस्य (स्किझोफ्रेनियावरील नाटक)
  • Dialogue To Wellness (मूळ मराठी - मुक्तिपत्रे, इंग्रजी भाषांतरकार - सतीश बापट)
  • त्या तिघांची गोष्ट (या नाटकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.)
  • देवराईच्या सावलीत
  • Nature 'N' Signature (मूळ मराठी स्वभाव-विभाव, इंग्रजी भाषांतरकार - सतीश बापट)
  • मनोगती
  • मनोविकास
  • मयसभा (या नाटकाला लेखन पुरस्कार मिळाला आहे,
  • माझं प्रिस्क्रिप्शन
  • मितुले आणि रसाळ
  • मुक्तिपत्रे
  • रंग माझा वेगळा (नाटक)
  • विषादयोग - ताण तणावांचे नियोजन
  • वैद्यकसत्ता
  • शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट (आत्मचरित्रपर)
  • स्वभाव-विभाव
  • हेही दिवस जातील!

पाहा व्हिडीओ : Dr Anand Nadkarni Passed Away | मानसोपचारतज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन