Miss World 2026 : व्हिएतनाममध्ये 73 वी मिस वर्ल्ड 2026 स्पर्धा पार पडली. आज (5 सप्टेंबर) मिस वर्ल्डचा महाअंतिम सोहळा पार पडला. या स्पर्धेत सुमारे 111 देशांनी भाग घेतला होता. यामधून डोमिनिकन रिपब्लिकची जोहेरी मोला डोमिंग्वेझने मिस वर्ल्ड 2026 चा किताब पटकावला आहे. तर निकिता पोरवालने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिला मात्र टॉप 20 मध्ये देखील स्थान मिळवता आलं नाही. ती स्पर्धेतून लवकरच पडली.
डोमिनिकन रिपब्लिकच्या जोहेरी मोला डोमिंग्वेझने 73 व्या मिस वर्ल्ड 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तिने स्पेनच्या एलिझाबेथ रेनेस (प्रथम उपविजेती) आणि मलेशियाच्या तानुसिया चेट्टी (द्वितीय उपविजेती) यांचा पराभव केला. तिला विजेतेपदाचा मुकुट ओपल सुचाता चुआंगसरी (थायलंड) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ओपल ही गेल्या वर्षी झालेल्या 72 व्या स्पर्धेची विजेती होती आणि आपल्या देशातून हा किताब जिंकणारी ती पहिलीच स्पर्धक होती.
अंतिम फेरीत जोहेरी मोला डोमिंग्वेझला विचारण्यात आले की, तुमच्या देशात तुम्ही 'ब्युटी विथ अ पर्पज' (सामाजिक कार्यासाठी सौंदर्य) अंतर्गत कोणत्या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे आणि 'मिस वर्ल्ड' बनल्यास त्यात तुम्ही कशी सुधारणा कराल? यावर डोमिंग्वेझने वंचित किंवा गरजू समुदायांमधील मुलांपर्यंत इंग्रजी शिक्षणाचे कार्यक्रम पोहोचवण्याच्या तिच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. माझा 'ब्युटी विथ अ पर्पज हा उपक्रम म्हणजे वंचित समुदायांमधील मुलांपर्यंत इंग्रजी शिक्षणाचे कार्यक्रम पोहोचवणे हा आहे. कारण भाषा अवगत केल्याने त्यांच्यासाठी संधींची मोठी दारे उघडली जाऊ शकतात. मी त्या मुलींशी बोलताना त्यांना सांगत होते की, याच माध्यमामुळे आज आपण इथे आहोत. ही भाषा आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची आणि आपला उद्देश मांडण्याची क्षमता देते.
मिस वर्ल्डच्या अधिकृत संकेतस्थळावर मिस वर्ल्ड 2026 जोहेरी मोला डोमिंग्वेझ या नवीन विजेतीचे वर्णन "समर्पित शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि उत्तम संवादक" असे करण्यात आले आहे. जोहेरीकडे 'युनिव्हर्सिडाड इबेरोअमेरिकाना' (Universidad Iberoamericana) मधून 'बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन'ची पदवी आहे. 'व्हॉइसेस ऑफ टुमारो' (Voices of Tomorrow) या संस्थेची संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून, जोहेरी वंचित समुदायांमधील मुले आणि तरुणांसाठी इंग्रजी शिक्षणाचा विस्तार करत आहे. ती इंग्रजी माध्यमातून साहित्य आणि सामाजिक शास्त्रे शिकवते, ज्यामुळे चिकित्सक विचारसरणी आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळते. 'युनिव्हिजन न्यूयॉर्क'च्या 'व्हेंटाना अ क्विस्केया' (Ventana a Quisqueya) कार्यक्रमासाठी वार्ताहर म्हणून काम करताना, जोहेरी डोमिनिकन संस्कृती, सामाजिक मुद्दे आणि समुदायातील कथांना प्रकाशझोतात आणते. 'गोया गिव्हज' (Goya Gives) ची ब्रँड ॲम्बेसेडर आणि व्यावसायिक मॉडेल असलेली जोहेरी मानवी नातेसंबंध, सहानुभूती आणि तिच्या अत्यंत एकोपा असलेल्या कुटुंबाकडून मिळालेल्या मूल्यांनी प्रेरित होऊन कार्य करते.