Aditya Dhar Struggle Story: सिनेसृष्टीत (Bollywood News) नशीब आजमावण्यासाठी अनेक कलाकार येतात, पण, त्यातले फारच थोडे यशाचं सर्वोच्च शिखर गाठतात. सिनेसृष्टी अनेक कलाकार आणि सिनेनिर्मात्यांचं माहेरघर आहे, ज्यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीतही आपली स्वप्न साकार केली. इंडस्ट्रीतल्या अशाच एका निर्मात्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याचे नाव आज हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये घेतले जातं. पण, कधीकाळी हा निर्माता रेडिओ जॉकी (Radio Jockey) म्हणून काम करत होता. आम्ही ज्या निर्मात्याबाबत बोलत आहोत, त्याचं नाव आदित्य धर. बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या 'धुरंधर' (Dhurandhar Movie) सिनेमाचा दिग्दर्शक-निर्माता. आता त्याचा आगामी सिनेमा 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) च्या चर्चा रंगल्या आहेत.
फार कमी लोकांना माहीत आहे की, आदित्य धरला लहानपणापासूनच 'डिस्लेक्सिया'चा (Dyslexia) सामना करावा लागला आहे. ही अशी एक स्थिती आहे, ज्यामुळे वाचणं, लिहिणं आणि शब्दांचा अर्थ समजून घेणं कठीण जातं. असं असूनही, त्यानं हार मानण्यास नकार दिला आणि केवळ आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय.
कश्मिरी कुटुंबात जन्म, 'डिस्लेक्सिया'वर केली मात
आदित्य धरचा जन्म 12 मार्च 1983 रोजी एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. अगदी लहानपणापासूनच त्याला सिनेमा आणि कथाकथनामध्ये (Storytelling) विशेष रुची होती. मात्र, त्याच्या शालेय आणि महाविद्यालयीन काळात त्याला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. डिस्लेक्सियामुळे त्याला वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी इतरांपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागायची. तरीही, या आव्हानाचा सामना करत त्यानं आपलं शिक्षण मोठ्या जिद्दीनं पूर्ण केलं आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग कधीच सोडला नाही. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यानं इंजिनिअरिंगचं (Engineering) शिक्षण घेण्याचं ठरवलं. त्यानं 'इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स' विषयात बी. टेक (B.Tech) डिग्री घेतली आणि त्यानंतर 'कम्युनिकेशन इंजिनिअरिंग'मध्येही पदवी मिळवली.
कधीकाळी 'रेडिओ जॉकी' अन् आता सुपरहिट सिनेमाचा निर्माता-दिग्दर्शक
आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, आदित्य धरनं सिनेसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यापूर्वी त्यानं 'रेडिओ जॉकी' म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्यानं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात, त्यानं सिनेमासाठी गाणी लिहिलीत. त्यानं 'काबुल एक्सप्रेस', 'डॅडी कूल' आणि 'हाल-ए-दिल' यांसारख्या चित्रपटांसाठी गीतं रचलीत. त्याच वेळी, तो पटकथा लेखनातही सक्रिय होता आणि त्यानं प्रियदर्शन यांच्या 'तेज' आणि 'आक्रोश' या सिनेमांसाठी लेखक म्हणून काम केलं. अनेक वर्ष लेखक आणि गीतकार म्हणून काम केल्यानंतर, आदित्य धरनं दिग्दर्शन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. पण, सुरुवातीला त्यालाही अनेकांप्रमाणे पहिली पायरी अपयशाचीच चढावी लागली.
सुरुवातीला त्याच्या हाती यश आलं नाही. 2016 मध्ये, त्यानं 'रात बाकी' पहिला सिनेमा दिग्दर्शित करण्याचं ठरवलं. या प्रोजेक्टमध्ये फवाद खान आणि कतरिना कैफ यांना मुख्य भूमिकेत घेण्याचं ठरवलं होतं. पण, त्या काळात सुरू असलेल्या राजकीय वादविवादांमुळे, चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. त्यानंतर, आदित्य धरनं एका नव्या कथेवर काम केलं आणि 2019 मध्ये त्याचा 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात विक्की कौशलनं मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं आणि यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये एक भक्कम ओळख निर्माण करता आली. या सिनेमानं एकूण 342.06 कोटींची कमाई केली.
पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार (National Award For First Film)
'उरी' (Uri) या सिनेमाच्या यशानंतर, आदित्य धरचं नाव सिनेसृष्टीतील अव्वल दिग्दर्शकांमध्ये गणलं जाऊ लागलं. याच सिनेमासाठी त्याला 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' देखील मिळाला. त्यानंतर, त्यानं अनेक नव्या प्रोजेक्ट्सवर काम सुरू केलं. आर्थिक मर्यादा आणि इतर कारणांमुळे यातील काही प्रोजेक्ट्स पुढे सरकू शकले नाहीत. पुढे, त्याचा 'धुरंधर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानं बॉक्स ऑफिसवर 1,349 ते 1,428 कोटींची कमाई केली. आता, त्याचा आगामी चित्रपट 'धुरंधर 2' मुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या सिनेमात रणवीर सिंह, आर. माधवन, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. केवळ 'अॅडव्हान्स बुकिंग'च्या माध्यमातूनच या सिनेमानं आतापर्यंत 50 कोटींची कमाई केली आहे. या यशासह, आदित्य धरच्या तीन चित्रपटांनी मिळून एकूण 1,820 कोटींची कमाई केली आहे. ज्यामुळे अव्वल दिग्दर्शकांच्या यादीत त्याचं स्थान अधिकच भक्कम झालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
