23 ऑगस्टला रात्रीच्या वेळेस महेश मांजरेकर यांच्या मोबाईल वर एक मॅसेज आला ज्याच्या मध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून मेसेजद्वारे 35 कोटी रुपये खंडणी मागितली. स्वतःला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा हस्तक सांगून हे पैसे पाठवण्याचे सांगण्यात आलं. 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान या व्यक्तीकडून वारंवार महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी मॅसेज येऊ लागले. तसेच फोनद्वारे ही त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 24 ऑगस्टला महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशन आणि खंडणी विरोधी पथकाकडे यासंदर्भात तक्रार केली. याची गांभीर्याने दखल घेत खंडणी विरोधी पथकाने तपास सुरू केला.
रत्नागिरी मधून आरोपीला अटक
26 ऑगस्टला दादर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आणि तो गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. याच्या तपासासाठी खंडणी विरोधी पथकाकडून दोन पोलीस पथक तयार करण्यात आली आणि त्यांनी कल्याण आणि ठाणे या ठिकाणी शोध सुरू केला. आरोपी मिलिंद तुळसकर आपला मोबाईल वारंवार बंद करत होता. ज्यामुळे पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता. गुप्त बातमी दाराकडून माहिती घेऊन आणि तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास करून हे मेसेज रत्नागिरी वरून येत असल्याचं कळलं आणि पथक रत्नागिरीपर्यंत पोहोचलं.
महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक
रत्नागिरी मधून मिलिंद तुळसकर याला खंडणीविरोधी पथकाने ताब्यात चौकशीसाठी मुंबईत घेऊन आले आणि चौकशी दरम्यान मिलिंद तुळसकरने त्याचा गुन्हा मान्य केला. युट्युब वर अबू सालेमचे व्हिडिओ पाहून मिलिंद तुळसकरला हा प्लॅन सुचला. आणि myneta.com वरून त्याने महेश मांजरेकर यांचा नंबर शोधून त्यांना खंडणीसाठी मेसेज करण्यास सुरुवात केली. मिलिंद तुळसकरचा अबू सालेमशी काही संबंध नाही, असं तपासामध्ये स्पष्ट झालं आहे. लवकरात लवकर जास्त पैसे कमावण्यासाठी त्याने हा गुन्हा केला असल्याचं सांगितलं.
मिलिंद तुळसकर याला 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी बजावण्यात आली.
Mahesh Manjrekar | अभिनेते महेश मांजरेकरांना अबू सालेमच्या नावानं 35 कोटींच्या खंडणीची मागणी