मुंबई : कंगना रनौतला (Kangana Ranaut) दिलासा देण्यास दिंडोशी सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. अंधेरी दंडाधिकारी कोर्टात जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याला स्थगिती देण्यास नकार देत कंगनाची याचिका फेटाळून लावण्यात आली. जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. शनिवारी कंगनाच्या अर्जावर सुनावणी पूर्ण करत न्यायाधीश एस.यु बगाले यांनी आपला निकाल राखून ठेवला होता.
गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं कंगना रनौतला नुकताच जामीन मंजूर केला आहे. कंगानानं काही दिवसांपूर्वी कोर्टापुढे प्रत्यक्ष हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता. मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा नाकरल्यानं आता कंगनापुढे हायकोर्टात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कंगनानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली. मात्र, या संवेदनशील प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसताना आपल्यावर खोटे आणि आधारहीन आरोप कंगनानं केले आहेत. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे असा आरोप करत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली आहे.
याप्रकरणी कंगनावर आयपीसी कलम 499 आणि 500 नुसार अब्रुनुकसानी केल्याचा फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी अख्तर यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यावर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात न्यायाधीश आर. आर. खन्हद यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई पोलिसांनी आपला चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर केला. मात्र, कंगनाचा यासंदर्भात जबाब नोंदवणं अद्याप बाकी असल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितले होतं. त्याची दखल घेत न्यायालयाने कंगनाला वॉरंट जारी केला होता.