Dashavatar For Oscars 2026: मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी मोठी बातमी समोर आली आहे. 2025 मध्ये प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवणारा ‘दशावतार’ हा चित्रपट आता थेट ऑस्कर अर्थात अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत पोहोचला आहे. मराठी सिनेइतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाची ‘मेन ओपन फिल्म कॅटेगरी’मध्ये निवड झाल्याने सिनेप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Continues below advertisement

‘दशावतार’ने गेल्या वर्षी केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर कलात्मक आणि विषयात्मक पातळीवरही आपली वेगळी छाप उमटवली होती. मराठी प्रेक्षकांबरोबरच अमराठी रसिकांनीही या सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. इतकंच नाही, तर हा चित्रपट मल्याळम भाषेतही प्रदर्शित करण्यात आला होता. आता 2026 मध्ये ‘दशावतार’ आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेमाचं नाव उंच होताना दिसतंय.

ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत व्यक्त केल्या भावना 

चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितलं की, अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेसाठी जगभरातून 150 हून अधिक चित्रपटांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये ‘दशावतार’ हा एकमेव मराठी चित्रपट आहे. विशेष म्हणजे अकॅडमीच्या स्क्रीनिंग रूममध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे.

Continues below advertisement

सुबोध यांनी निर्मात्यांना आलेल्या ई-मेलचा स्क्रिनशॉट शेअर करत ही निवड अधिकृत असल्याचं स्पष्ट केलं. या पोस्टसोबत त्यांनी लिहिलं की, अनेक वर्षांची मेहनत, प्रामाणिक प्रयत्न आणि मोठी स्वप्नं पाहण्याची हिंमत याची दखल आज घेतली जात आहे. ‘दशावतार’ची ही निवड केवळ एका चित्रपटाचं यश नसून, मराठी सिनेमा जागतिक व्यासपीठावर तोडीस तोड उभा राहू शकतो, याचा हा ठोस पुरावा आहे. असं ते म्हणाले.

 

कलाकारांची तगडी फौज, प्रभावळकरांचा बाबूली गाजला 

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मेस्त्री या दशावतार कलाकाराची प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. याशिवाय महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, रवी काळे, विजय केंकरे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर आणि कोकणातील स्थानिक कलाकारांनीही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. जिंकणं किंवा पराभव हा पुढचा टप्पा असला, तरी ऑस्करच्या मुख्य प्रवाहात मराठी चित्रपटाचा समावेश होणं हीच मोठी गोष्ट आहे. ‘दशावतार’मुळे मराठी सिनेमाची मान जागतिक स्तरावर उंचावली असून, ही केवळ सुरुवात असल्याचं मत सिनेप्रेमींनी व्यक्त केलं आहे.