Ranapati Shivaray Swari Agra: चिन्मय मांडलेकरनंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्याची निवड झाली असून, या नावाची चर्चा सध्या मराठी मनोरंजनविश्वात रंगू लागली आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘श्री शिवराज अष्टक’ ही मालिका आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पाचही चित्रपट ऐतिहासिक भव्यता, मांडणी आणि अभिनयामुळे गाजले. आता या मालिकेतील सहावा चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, हाच होता.

गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे ही उत्सुकता अधिकच वाढली. टीझरमध्ये मुघल सत्तेच्या कडेकोट बंदोबस्ताला चकवा देत महाराजांनी उचललेलं धाडसी पाऊल, औरंगजेबाच्या दरबारातील तणावपूर्ण वातावरण आणि आग्रा स्वारीचा थरारक संदर्भ पाहायला मिळाला. मात्र टीझरमध्ये महाराजांची केवळ झलक दाखवण्यात आल्याने, भूमिका साकारणारा अभिनेता कोण, याबाबत प्रेक्षकांमध्ये कुतूहल कायम होतं.

कोण साकारणार शिवरायांची भूमिका?

अखेर या सस्पेन्सवर पडदा पडला आहे. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र साकारणार आहे. स्वतः अभिजीतने सोशल मीडियावर महाराजांच्या भूमिकेतील पोस्टर शेअर करत ही माहिती जाहीर केली. पोस्टर समोर येताच चाहत्यांकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी अभिजीतवर विश्वास व्यक्त करत, ही भूमिका तो समर्थपणे निभावेल, असा विश्वासही कमेंट्समधून व्यक्त केला आहे.

दिग्पाल लांजेकर यांच्या आधीच्या चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली होती. मात्र वैयक्तिक कारणांमुळे आणि ट्रोलिंगनंतर त्याने ही भूमिका पुढे न करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे नव्या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली.

कोण आहे अभिजीत श्वेतचंद्र?

अभिजीत श्वेतचंद्र हा मराठी प्रेक्षकांसाठी नवा चेहरा नाही. ‘नवे लक्ष्य’, ‘शुभविवाह’, ‘आई तुळजाभवानी’ यांसारख्या मालिकांमधून त्याने छोट्या पडद्यावर ओळख निर्माण केली आहे. तसंच ‘सुभेदार’ आणि ‘शिवरायांचा छावा’ यांसारख्या चित्रपटांमधून ऐतिहासिक भूमिकांचा अनुभवही त्याच्याकडे आहे. आता ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मधून तो थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असून, हा चित्रपट शिवजयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शिवचरित्रातील हा शौर्यपूर्ण अध्याय मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.